
पनवेल (वार्ताहर) : पनवेल शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये सुधारणा होण्याच्या दृष्टीने शहरातील विविध ठिकाणांच्या वाहतूक व्यवस्थेचा अभ्यास करून, विकास आराखडा, वाहतुकीशी संबंधित प्राथमिक दस्तऐवज वापरून या सर्वेक्षणाला सुरुवात केली गेली आहे. या अंतर्गत ओडी अर्थात ओरीजीन डेस्टिनेशन सर्वेला सुरुवात होणार आहे. यासाठी वाहतूक पोलिसांची मदत पालिका घेणार आहे. या उद्देशाने आज आयुक्त गणेश देशमुख यांनी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड आणि वाहतूक पोलीस निरीक्षक पनवेलचे संजय नाळे यांच्यांशी चर्चा केली. वाहतुकीशी निगडित विविध विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त सचिन पवार, शहर अभियंता संजय जगताप, कार्यकारी अभियंता संजय कटेकर उपस्थित होते.
पनवेल शहराची व्यापक वाहतूक योजना आणि पार्किंग धोरण तयार करण्याच्या दृष्टीने पनवेल महापालिका हद्दीत सर्वेक्षण सुरू झाले आहे. या अंतर्गतच ओडी सर्वेक्षण होणार असून सोळा तास हे सर्वेक्षण पनवेल शहरात येणाऱ्या मुख्य रस्त्यांवर होणार आहे. यादरम्यान वाहतूक कोंडी न होता सुरळीत वाहतूक व्हावी, यासाठी आज आयुक्तांनी वाहतूक उपायुक्तांशी चर्चा केली. त्याचबरोबर पनवेल शहराला स्वत:ची वाहतूक पोलीस चौकी उभारण्यासाठी जागा निर्माण करण्यावर यावेळी सकारात्मक चर्चा झाली. तसेच, कळंबोली सर्कलवरती होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी पालिकेच्या मध्यस्थीने वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्याच्या विषयावर यावेळी चर्चा झाली.