राष्ट्रवादीचा आरोप
रवींद्र थोरात
बदलापूर : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून अंबरनाथ व बदलापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी उभारण्यात आलेल्या जलकुंभाची गेल्या वर्षभरापासून साफसफाई झालेली नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटक सचिव हेमंत रुमणे यांनी केला आहे. जलकुंभाची साफसफाई न झाल्यास जलजन्य आजार वाढण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून अंबरनाथ व बदलापूर शहराला पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी या दोन्ही शहरात अनेक उंच जलकुंभ व भूस्तर जलकुंभ बांधण्यात आले आहेत. या जलकुंभाची नियमित सफाई न झाल्यास दूषित व अस्वच्छ पाणीपुरवठा होऊन नागरिकांना कावीळ वा तत्सम जलजन्य आजारांची लागण हाऊ शकते.
या पार्श्वभूमीवर या जलकुंभाची वर्षातून एकदा तरी आतून मशीन यंत्राद्वारे साफसफाई करण्यात यावी, अशी मागणी रूमणे यांनी २०१९ मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे केली होती. त्याची दखल घेऊन मजीप्राच्या अधिकाऱ्यांनी हायप्रेशर मशीनद्वारे जलकुंभाची आतून सफाई करण्यास सुरुवात केली होती. अशाप्रकारे बदलापूर शहरात ८ जलकुंभांची सफाई करण्यात आली होती. अंबरनाथ शहरातील जलकुंभांचीही अशाप्रकारे सफाई करण्यात येणार होती. मात्र, मजीप्राचे अंबरनाथ विभागाच्या तत्कालीन कार्यकारी अभियंत्यांनी अचानक हे काम बंद केले. त्यानंतर मजीप्राच्या डीएसआर मधूनही हे काम वगळण्यात आले. सुमारे वर्षभरापासून हे काम बंद असून पुन्हा डीएसआरमध्ये समावेश झाल्याशिवाय हे काम होणार नसल्याचे रुमणे यांचे म्हणणे आहे.
जलजन्य आजारांचा धोका लक्षात घेता नागरिकांना शुद्ध पाणी मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी इतर उपाययोजना करण्याबरोबरच जलकुंभाची साफसफाई महत्त्वाची आहे. जलकुंभाची नियमित सफाई करण्याबाबत आदेश देण्याची विनंती केली असल्याचेही रूमणे यांनी सांगितले.
वर्षातून एकदा जलकुंभ सफाई करायची असते. जलकुंभ सफाईच्या कामाचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो वरिष्ठ कार्यालयाला मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. – एम. एस. बसनगार (कार्यकारी अभियंता – मजीप्रा, अंबरनाथ विभाग)