मुंबई (प्रतिनिधी) : कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) कल्याण, मीरा रोड, विरार, नवी मुंबई, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यातील विविध गृहप्रकल्पांतर्गत उभारलेल्या ८ हजार ९८४ सदनिकांच्या विक्रीकरिता प्राप्त अर्जाची संगणकीय सोडत १४ ऑक्टोबर, २०२१ रोजी ठाणे येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते काढण्यात येणार आहे.
ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या ८९८४ सदनिकांकरिता अर्जदारांकडून चांगला प्रतिसाद लाभला असून सुमारे २ लाख ४६ हजार ६५० अर्जदार या सोडतीत सहभागी होत आहेत.
ठाणे येथील संगणकीय सोडतीच्या कार्यक्रमास उपस्थित राहू इच्छिणाऱ्या अर्जदारांनी ओळखपत्र व अर्जाची मूळ पावती सोबत आणावी. अर्जाची मूळ पावती नसल्यास अर्जदाराला सभागृहात प्रवेश दिला जाणार नाही. नाट्यगृहात मर्यादित अर्जदारांनाच प्रवेश दिला जाणार आहे. https://mhada.ucast.in या लिंकवर क्लिक करून सोडतीचे घरबसल्या वेबकास्टिंगद्वारे थेट प्रक्षेपण बघण्याची सुविधा म्हाडातर्फे उपलब्ध करून दिली आहे. सोडतीचा निकाल दि. १४ ऑक्टोबर, २०२१ रोजी सायंकाळी ६ वाजता https://lottery.mhada.gov.in व https://mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळांवर प्रसिद्ध केला जाणार आहे, https://lottery.mhada.gov.in अशी माहिती कोंकण मंडळाचे मुख्य अधिकारी नितीन महाजन यांनी दिली.