Tuesday, December 3, 2024
Homeक्रीडादिल्लीसाठी जेतेपद दूरच

दिल्लीसाठी जेतेपद दूरच

शारजा (वृत्तसंस्था) : साखळीमध्ये चमकदार खेळ करणाऱ्या ऋषभ पंतचा संघ बाद फेरीत ढेपाळला आणि दिल्ली कॅपिटल्ससाठी आयपीएल जेतेपद दूर राहिले. क्वॉलिफायर २मध्ये बुधवारी कोलकाता नाईट रायडर्सकडून तीन विकेट आणि एका चेंडूंने पराभूत व्हावे लागल्याने गतउपविजेता दिल्लीला सलग दुसऱ्या खेपेस फायनल प्रवेशापासून वंचित राहावे लागले.

दिल्लीने गत हंगामात अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र, मुंबई इंडियन्सविरुद्ध त्यांचे काहीच चालले नाही. त्यामुळे पहिल्यांदा फायनल गाठूनही उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. सुरुवातीला श्रेयस अय्यर त्यानंतर रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्लीने १४पैकी १० सामने जिंकताना २० गुणांसह अव्वल स्थान पटकावले. यंदाच्या हंगामात केवळ त्यांना डबल फिगर सामने जिंकता आले. गुणतालिकेत टॉपला असल्याने दिल्ली दिमाखात अंतिम फेरी गाठणार, असे वाटत होते. मात्र, चेन्नई सुपर किंग्जने बाजी मारली. दुसऱ्या प्रयत्नात कोलकात्याविरुद्ध फलंदाजांनी चुका न सुधारल्याने दिल्लीचे आव्हान प्ले-ऑफ फेरीत संपुष्टात आले.

गोलंदाजांनी गाजवलेल्या लढतीत बुधवारी दिल्लीचे १३६ धावांचे आव्हान गाठताना कोलकात्याला घाम गाळावा लागला. शुबमन गिल (४६ चेंडूंत ४६ धावा) तसेच वेंकटेश अय्यरमुळे (४१ चेंडूंत ५५ धावा) दमदार सुरुवात करताना १२.२ षटकांत ९६ धावांची सलामी दिली. मात्र, पुढील ४० धावा करण्यासाठी ८.२ षटके लागली. नितीश राणाने १३ तसेच राहुल त्रिपाठीने नाबाद १२ धावा करताना खेळपट्टीवर थांबण्याचा प्रयत्न केला तरी, यष्टिरक्षक दिनेश कार्तिक, कर्णधार इयॉन मॉर्गनसह अष्टपैलू शाकीब अल हसन तसेच सुनील नरिन यांना खाते खोलता न आल्याने सामन्यांत रंगत वाढली.

कॅगिसो रबाडा, अॅन्रिच नॉर्टजे आणि अवेश खान या वेगवान त्रिकुटासह ऑफस्पिनर आर. अश्विनने अचूक मारा करताना नाईट रायडर्सच्या नाकीनऊ आणले. शेवटच्या षटकात ७ धावांची गरज होती. त्यात अनुभवी अश्विनने पहिल्या ४ चेंडूंत २ विकेट घेताना केवळ एक धाव दिल्याने दिल्लीचे पारडे जड झाले. मात्र, २ चेंडूत विजयासाठी ६ धावांची गरज असताना त्रिपाठीने अश्विनच्या पाचव्या चेंडूला त्याच्या डोक्यावरून सीमारेषेपार फेकून देत सामना संपवला.

दिल्लीच्या गोलंदाजांनी विजयासाठी कसोशीने प्रयत्न केले तरी दिल्लीच्या फलंदाजांनाही अपेक्षित खेळ करता आला नाही. त्यांच्या पाच फलंदाजांना दोन आकडी धावा करता आल्या. त्यात डावखुरा सलामीवीर शिखर धवनचे सर्वाधिक ३६ धावांचे योगदान होते. त्यानंतर श्रेयस अय्यरमुळे (२७ चेंडूंत नाबाद ३० धावा) कॅपिटल्सना निर्धारित २० षटकांत ५ बाद १३५ धावांची मजल मारता आली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -