Friday, October 17, 2025
Happy Diwali

काटकसरीने वीजवापर करा

काटकसरीने वीजवापर करा

मुंबई (प्रतिनिधी) : कोळसा टंचाईमुळे राज्यातील वीज निर्मिती कमी झाली असून गरजेनुसार महागड्या दराने वीज खरेदी करून ग्राहकांना वीजेचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे ग्राहकांनी काटकसरीने विजेचा वापर करा, असे आवाहन उर्जामंत्री नितीन राऊत यांनी केले आहे.

राज्यातील कोळसा टंचाई आणि त्यामुळे वीज निर्मितीत झालेली घट याबाबत त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. राज्यात मागणीच्या तुलनेत ३ हजार मेगावॅट वीजेचे कमतरता जाणवत आहे. ही वीजेची तूट भरून काढण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी पर्यत्न करीत आहे असे उर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले.

महावितरणने सुद्धा त्यांची एकूण वीजेची मागणी १८,१२३ मेगावॅट आणि मुंबईसह एकूण मागणी २०,८७० मेगावॅट सायंकाळी पिक डिमांड पूर्ण केले आहे. महानिर्मितीने वीज उत्पादनामध्ये उत्तम समन्वय राखल्याने कोळशाची आवक वाढली. वीज उत्पादन वाढूनसुद्धा कोळसा साठ्यात सुधारणा आहे. भुसावळ येथे वीज उत्पादन संच सुरु करण्यात आल्याने वीजेमध्ये अधिकची भर पडणार आहे, असे राऊत म्हणाले.

कोळसा टंचाई असताना देखील भुसावळ येथील २१० मेगावॅट, चंद्रपूर येथील ५०० मेगावॅट, नाशिक येथील २१० मेगवॅट हे संच सध्या बंद आहेत. तसेच नियमित देखभाल दुरुस्तीसाठी तीन संच बंद आहेत. एकूण २७ पैकी सात संच बंद आहेत. कोळसा वाहून नेण्याची कोल इंडियाची क्षमता ४० लाख मेट्रिक टन आहे. पावसामुळे ती २२ लाख मेट्रिक टन इतकी खाली होती. ती आता २७ लाख मेट्रिक टनापर्यंत आलेली आहे. त्यामुळे कोल इंडियाकडून क्षमतेनुसार कोळशाचा पुरवठा केला जावा यासाठी प्रयत्न करत आहोत, असे नितीन राऊत म्हणाले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा