Friday, December 13, 2024
Homeक्रीडासंघातून अचानक वगळताना कुठलेही कारण दिले नाही

संघातून अचानक वगळताना कुठलेही कारण दिले नाही

हैदराबाद फ्रँचायझीवर वॉर्नर भडकला

दुबई (वृत्तसंस्था) : संघातून वगळताना कुठलेही कारण दिले नाही, असे सनरायझर्स हैदराबादचा माजी कर्णधार डेव्हिड वॉर्नरने म्हटले आहे. खराब फॉर्ममुळे काढून टाकले, हा आरोपही त्याने फेटाळले आहे.

संघमालक, प्रशिक्षक ट्रेव्हर बेलिस, व्ही. व्ही. एस लक्ष्मण, टॉम मुडी आणि मुथय्या मुरलीधरन या हैदराबादशी निगडित सर्वांविषयी मला खूप आदर आहे. मात्र, संघाबाबतचा कोणताही निर्णय एकमतानेच घेतला जातो. त्यामुळे कोणाचा तुम्हाला पाठिंबा होता आणि कोणाचा नव्हता, हे सांगणे फार अवघड आहे. मला धावांसाठी झुंजावे लागत होते हे त्यांचे कारण असल्यास तुम्ही मागील काही वर्षांतील कामगिरीचाही विचार करणे गरजेचे आहे, असं वॉर्नर म्हणाला.

अजून एक निराशाजनक बाब म्हणजे कर्णधारपदावरुन हटवण्याचं कारण मला सांगण्यात आलं नाही. जर तुम्ही कामगिरीनुसार निर्णय घेत असाल तर मग हे कठीण आहे कारण माझ्या मते तुम्ही भूतकाळात जे केलं आहे त्याच्याआधारे तुम्ही भविष्यात पुढील वाटचाल करत असता. खासकरुन जेव्हा तुम्ही संघासाठी १०० सामने खेळलेला असता. मला उत्तरं मिळणार नाहीत असे अनेक प्रश्न आहेत. पण आपण पुढील वाटचाल करायची असते, असं वॉर्नरने सांगितले आहे.

डेव्हिड वॉर्नरने यावेळी पुढील वर्षीदेखील आपल्याला हैदराबादकडून खेळायला आवडेल सांगताना हे आपल्या हातात नसल्याचेही म्हटलं आहे. मला पुढील वर्षीही हैदराबादकडून खेळायला आवडेल, पण हे वेळच सांगेल. मी आयपीएल २०२२ चा भाग असेन. दिल्लीकडून खेळत मी माझ्या आयपीएल करिअरची सुरुवात केली आणि नंतर हैदराबादकडून खेळलो. जी काही संधी मिळेल तिची मी वाट पाहत असून आपलं १०० टक्के देण्याचा प्रयत्न असेल, असे वॉर्नरने सांगितले आहे.

आयपीएलच्या मध्यात हैदराबाद फ्रँचायझीने नेतृत्वात बदल करत डेव्हिड वॉर्नरला कर्णधारपदावरुन हटवलं आणि प्लेईंग इलेव्हनमधून गच्छंती केली. पहिल्या सहा पैकी पाच सामन्यांमध्ये पराभव झाल्यानंतर डेव्हिड वॉर्नरच्या जागी केन विल्यम्सनकडे कर्णधारपद सोपवण्यात आले. वॉर्नरने या हंगामात आठ सामने खेळत १९५ धावा केल्या. यामध्ये दोन अर्धशतकांचाही समावेश आहे. २०१५ नंतर पहिल्यांदाच हैदराबाद संघ प्लेऑफ फेरीमध्ये जागा मिळवण्यात अपयशी ठरला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -