फडणवीस यांचा पवारांवर पलटवार
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवरील कारवाई उच्च न्यायालयाच्या आदेशाने झाली. न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. या सरकारने सीबीआयने चौकशीच करू नये, असे सांगितल्याने ज्यांनी देशाचे पैसे बुडविले, अशी बँक फसवणुकीची ८० प्रकरणे धुळखात पडून आहेत. आता उच्च न्यायालयावरसुद्धा यांचा विश्वास नाही काय, असा प्रश्न विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना केला.
जालियनवाला बागचा गोळीबार पोलिसांनी केला असला तरी त्यावेळी आदेश ब्रिटिशांच्या गव्हर्नर जनरल यांचे होते. अगदी तसेच मावळचा गोळीबार पोलिसांनी केला तरी त्यांना आदेश तेव्हाच्या राज्यकर्त्यांचे होते. त्यामुळे मावळ गोळीबारची घटनासुद्धा जालियनवाला बागसारखीच घटना आहे, असे प्रत्त्युत्तर त्यांनी दिले.
शरद पवारांची पत्रकार परिषद कशासाठी होती, हेच लक्षात आले नाही. ते अनेक विषयांवर बोलले. उत्तर प्रदेशच्या घटनेवर महाराष्ट्रात बंद केला जातो आणि तोही सर्व यंत्रणांचा वापर करीत, संपूर्ण दडपशाही करून. या बंददरम्यान, पहिल्यांदा असे घडले की पोलीस संरक्षणात लोकांवर दबाव आणला गेला आणि त्यांना धमकावून बंद केला गेला. हा बंद किती ‘शांतते’त झाला, हे आता लक्षात येते. राज्यपुरस्कृत भीती निर्माण करून केलेला हा बंद होता.
शिवसेना बंदमध्ये सामिल झाली तर काय होते, हे स्वत: शरद पवार यांनीच सांगितले, ही तशी समाधानाची बाब आहे. पोलिस संरक्षणात मारहाण, धमक्या, दुकानांमधील माल लुटून नेणे चालू होते आणि पोलिस बघ्याची भूमिका घेत होते, असेही ते म्हणाले.