
नालासोपारा (वार्ताहर) : आदिवासी विकास विभाग आणि आदिवासी विभाग महामंडळ यांच्या मार्फत आदिवासीयांना खावटीच्या किटचे वाटप चालू आहे. या वाटपात बारा प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू वाटपाची घोषणा शासनाने केली आहे. तर अर्नाळा ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत कार्यालयात ३७७ लाभार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप केले. परंतु, यातील वस्तू अतिशय निकृष्ट दर्जाच्या निघाल्याने आदिवासिंच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
आदिवासी समाजाला चांगल्या प्रकारचे अन्न मिळावे व त्यांचे हाल होऊ नयेत, यासाठी आदिवासी विकास विभाग आणि आदिवासी विभाग महामंडळ यांच्यामार्फत आदिवासिंसाठी अन्न - धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंच्या ‘किट’चे वाटप करण्यात आले. बुधवारी अर्नाळा ग्रामपंचायतीने लेखी ग्रामपंचायत कार्यालयात जीवनावश्यक वस्तूंचे ३७७ किट वाटले. परंतु बंद पाकिटे उघडली असता त्यातील डाळ ही बुरशीने माखलेली दिसली. इतर दुसऱ्या वस्तू देखील जुन्या व खराब दर्जाच्या देण्यात आल्या आहेत असे निदर्शनास आले. कोरोना काळात आदिवासींचा रोजगार गेला, उपासमारी सुरू झाली. त्यामुळे आदिवासींना केवळ रेशनचे तांदूळ न देता खावटीचा लाभ देखील मिळावा यासाठी योजना काढण्यात आली. या योजनेत २००० पर्यंतचे सामान व २००० बॅंक खात्यात, असे धोरण करण्यात आले होते.
खावटी अनुदान योजनेत एका कूटुंबास मटकी, चवळी, हरभरा, वाटाणा, उडीद डाळ, तूर डाळ, साखर, शेंगदाणे तेल, गरम मसाला, मिरची पावडर, मिठ, चहापत्ती अशा दोन हजार रु. पर्यंतच्या वस्तूंचे किट देण्यात येईल अशी योजना आहे. मात्र, आधीच या योजनेस उशीर झाला. तर उशिराने आलेल्या या किटमध्ये खराब व निकृष्ट दर्जाच्या वस्तूंचे वाटप करून आदिवासींची फसवणूक केली गेली आहे. आदिवासींच्या जिवाशी खेळण्याचे काम शासनाने चालविले आहे. तर त्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.
लाभ देण्याच्या नावाखाली प्रशासनाने अतिशय हलक्या दर्जाचे सामान दिल्याने आदिवासींना या वस्तूंचा काहीच उपयोग नाही. याला जबाबदार नेमका कोण आहे? तर यावर कारवाई होणार कधी? असे प्रश्न उपस्थित राहत आहेत. तसेच याबाबत तातडीने चौकशी करून या संपूर्ण प्रकाराची कारवाई करावी; तसेच वाटण्यात आलेल्या खराब व निकृष्ट वस्तूंची पाहणी करुन पुन्हा चांगल्या दर्जाच्या वस्तूंचे वाटप करण्यात यावे, अशी मागणी आदिवासी वर्गाकडून करण्यात येत आहे.