
अनंता दुबेले
कुडूस : भिवंडी-वाडा-मनोर या महामार्गावर खड्ड्यांसोबत धुळीचेही साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणे कठीण झाले आहे. तर अनेक प्रवाशांचे अपघातही झाले आहेत. येथील खड्ड्यांची चाळण झाली असून दुचाकीसह इतर अवजड वाहनांनी प्रवास करणे प्रवाशांसाठी गैरसोयीचे झाले असून धूळीमुळे प्रवाशांना श्वसनासाठी त्रास होत आहे.
भिवंडी - वाडा -मनोर हा ४४ कि.मी. अंतराच्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यात वाहने अडकून ती पलटी होत असून त्यांचे नुकसान होत आहे. तर या रस्त्यावर अनेक अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर कित्येक जण जखमी झाले आहेत. गेल्या पाच ते सहा वर्षापासून रस्त्याची हीच अवस्था आहे. अनेक वर्षे हा रस्ता सुस्थितीत नसल्याने येथील नागरिक, रस्त्यावरून येणारे-जाणारे वाहन चालक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.
पालघर जिल्ह्यात नुकत्याच जि.प. आणि पं.स. निवडणुका झाल्या असून या निवडणुकीत प्रसारासाठी प्रत्येक पक्षाचे दिग्गज नेते, मंत्री ज्या तत्परतेने प्रचारासाठी येथे आले व तळ ठोकून बसले होते. तीच तत्परता या रस्ता दुरुस्तीबाबत कधी त्यांनी दाखवली नाही. हीच खरी शोकांतिका आहे, असे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत भोईर यांनी सांगितले.