शारजा (वृत्तसंस्था) : आयपीएलच्या यंदाच्या हंगामाच्या बाद फेरीतील क्वॉलिफायर २ लढतीत बुधवारी (१३ ऑक्टोबर) दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने आहेत. या लढतीतील विजेता थेट फायनलमध्ये माजी विजेता चेन्नई सुपर किंग्जशी दोन हात करणार आहे. त्यामुळे, क्वॉलिफायर २ लढतीकडे दुसरा सेमीफायनल म्हणून पाहिले जात आहे.
रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्लीने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले तरी क्वॉलिफायर १मध्ये खेळ उंचावत त्यांना अंतिम फेरीत प्रवेश करता आला नाही. दुसरीकडे, चेन्नईसह कर्णधार महेंद्रसिंग धोनीने अनुभवाच्या जोरावर नवव्यांदा फायनल प्रवेश केला. थेट अंतिम फेरीची संधी हुकली तरी कॅपिटल्सना सुपरकिंग्जशी पुन्हा भिडण्याची संधी आहे. एलिमिनेटरमध्ये बंगळूरु रॉयल चॅलेंजर्सना हरवत कोलकाता नाइट रायडर्सनी फायनलच्यादृष्टीने वाटचाल केली. दिल्ली कॅपिटल्सचा संघ सलग दुसऱ्या सत्रात अंतिम फेरी गाठण्यासाठी उत्सुक आहे. मात्र, इयॉन मॉर्गनच्या संघाचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असेल. सातत्य राखण्यादृष्टीने कोलकात्याचाही कस लागेल.
चेन्नईवर वर्चस्व गाजवण्याची संधी हुकली तरी दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतने फलंदाजीमध्ये विशेष छाप पाडली. पंतला त्याच्या नेतृत्वाच्या आणखी एका महत्त्वपूर्ण सामन्यात मधल्या फळीत बॅटने प्रभाव पाडून संघाचे काम सोपे करावे लागेल. तसेच शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांची सलामी जोडी पुन्हा एकदा प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व गाजवण्यासाठी उत्सुक आहे. श्रेयस अय्यर या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद भूषवत नसला तरी त्याने त्याच्या संघाचा एक सीनियर खेळाडू म्हणून पूर्ण जबाबदारी निभावली आहे. वेस्ट इंडिजचा अष्टपैलू शिमरॉन हेटमायरने मोठी खेळी खेळली नसली तरी त्याने छोटा डाव खेळून सांघिक कामगिरीमध्ये योगदान देण्याचा प्रयत्न केला. अष्टपैलू अक्षर पटेल फॉमार्त नसला तरी या मोसमात फिरकी गोलंदाजीमध्ये केवळ छाप पाडली नाही, तर गरजेच्या वेळी फलंदाजीतही चांगले योगदान दिले आहे. त्यामुळे त्याला संघात आणखी एक संधी दिली जाऊ शकते.अश्विन संघाचा दुसरा फिरकीपटू असेल. अश्विनने त्याच्या गोलंदाजीमुळे निराशा केली आहे पण पंत महत्वपूर्ण सामन्यात विश्वास दाखवेल. गोलंदाजी आक्रमणात कॅगिसो रबाडा हे एक मोठे नाव आहे. आणि या संघासाठी तो एक अत्यंत महत्त्वाचा खेळाडू आहे. त्यामुळे त्याला वगळण्याचा धोका दिल्ली पत्करू शकत नाही. यंदाच्या हंगामात दिल्लीसाठी कोणत्याही गोलंदाजाने सर्वात जास्त प्रभाव पाडला असेल तर तो अवेश खान आहे. पर्पल कॅप शमिळवण्याच्या रेसमध्ये तो आघाडीवर आहे. गेल्या वर्षापासून वेगवान गोलंदाज अॅन्रिक नॉर्टजेने दिल्ली संघात वेगळी ओळख निर्माण केली आहे. या गोलंदाजाच्या वेगाने अनेक फलंदाज आश्चर्यचकित झाले आहेत. नॉर्टजेने या हंगामात ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सला त्याच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवू शकते.
बंगळूरुला हरवत कोलकाताने अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यांना फलंदाजीत शुबमन गिल, वेंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी आणि नितीश राणा तसेच गोलंदाजांना वरुण चक्रवर्ती तसेच शिवम मावीकडून मोठे योगदान अपेक्षित आहे. कर्णधार इयॉन मॉर्गन आणि दिनेश कार्तिक तसेच शाकीब अल हसनला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. या सामन्यात त्यांना सूर गवसावा, असे नाइट रायडर्सच्या चाहत्यांना वाटत आहे.
वेळ : सायं. ७.३० वा.