मुंबई (विशेष प्रतिनिधी) : ‘राज्यातल्या महाविकास आघाडीतील तीनही पक्ष हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारबद्दल बदनामीचा कसा सुनियोजित कट रचत आहेत याचा भांडाफोड आम्ही जनतेसमोर करणार आहोत. खोट्या कल्पनांवर स्वतःच्या विजयाची गुढी उभारण्याचा त्यांचा प्रयत्न महाराष्ट्रातली जनता उधळून लावेल’, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार आशीष शेलार यांनी व्यक्त केला.
भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाच्या कोअर कमिटीची बैठक मंगळवारी पक्षाच्या केंद्रीय नेत्यांच्या उपस्थितीत झाली. केंद्रीय प्रभारी सी. टी. रवी, पक्षाचे केंद्रीय संघटन मंत्री शुक्ला, सहप्रभारी पवय्या, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात ही बैठक झाली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, संघटनमंत्री श्रीकांत भारतीय, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा आणि इतर सर्व सदस्य उपस्थित होते.
महाराष्ट्रातील जनतेला आवश्यक त्या सेवासुविधा मिळत नाहीत, विकास करू शकत नाहीत, शेतकऱ्याला काहीही मिळत नाही, विद्यार्थ्याला मिळत नाही, बारा बलुतेदारांचा हक्क मिळत नाही, दलित समाजाच्या बंधू-भगिनींना मिळत नाही, मराठा समाजाला मिळत नाही, म्हणून आम्ही महाराष्ट्रातील जनतेच्या हक्कासाठी आंदोलनाची रुपरेषासुद्धा आज ठरवली आहे. येणाऱ्या काळात आम्ही सत्ताधारी आघाडीला ‘सळो की पळो’ करुन सोडू, असेही त्यांनी सांगितले.
‘राज्याच्या भाजपचा संघटनात्मक कामाचा आढावा आणि लेखाजोखा आज आम्ही घेतल्याचे शेलार म्हणाले.