सेवाव्रती : शिबानी जोशी
संस्कृत ही जगातील प्राचीन भाषांतील एक महत्त्वपूर्ण भाषा आहे. जगातील सर्वात प्राचीन दहा भाषांमध्ये भारतातील संस्कृत आणि तमिळ भाषांचा समावेश होतो. संस्कृत ही देववाणी मानली जाते; परंतु दुर्दैवाने संस्कृत भाषेचा वापर आपल्या देशात कमी कमी होत चालला आहे, तिची उपेक्षा होत आहे. देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीनंतर विविध राज्यांमध्ये संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी तसेच संस्कृत भाषेत रुची निर्माण होण्यासाठी विविध संघटना कार्यरत झाल्या होत्या. अनेक राज्यात भारत संस्कृत परिषद, हिंदू सेवा प्रतिष्ठान, विश्व संस्कृत प्रतिष्ठापण, लोक भाषा प्रचार समिती अशा विविध संघटना १९७५च्या सुमारास समान काम करत होत्या. पुण्यात टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे ही संस्कृतच्या विविध परीक्षा घेतल्या जात असत. संघ कार्यकर्त्यांनी संस्कृत शिकावे तसेच संस्कृतचा संभाषणांमध्ये वापर करून ती व्यावहारिक भाषा करणे, यासाठीही या संस्था आग्रही असायच्या. संघ, विश्व हिंदू परिषदेच्या सहयोगानंही काही संस्था संस्कृत प्रचाराचं काम करत होत्या.
१९९५-९६च्या सुमारास दिल्लीमध्ये सर्व संस्था चालकांच्या हे लक्षात आलं आणि समान हेतूने काम करणाऱ्या सर्व संस्थांची एक शिखर संस्था असावी म्हणून संस्कृत भारती या संघाच्या सहयोगाने चालणाऱ्या संघटनेची स्थापना झाली. संस्कृतचा प्रचार आणि प्रसार तसंच संस्कृत पुन्हा संभाषणाची भाषा बनावी हा संस्कृत भारतीचा उद्देश आहे. संस्कृत विषय घेऊन शालेय किंवा महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थी शिक्षण घेत असतात; परंतु त्याशिवाय इतरही कुणाला संस्कृत भाषेत रुची असू शकते, त्यांना संस्कृत शिकवणं, संभाषणातून संस्कृत भाषेचा वापर करणं, यासाठी संस्कृत भारती विशेषत्वानं काम करते. इथे शिकण्यासाठी कोणतीही पात्रता लागत नाही. संस्कृत संभाषण वर्ग, शलाका परीक्षा, व्याकरणवर्ग, शालेय परीक्षा, पोस्टल कोर्स लहान मुलांसाठी हसत-खेळत संस्कृत वर्ग घेतले जातात.
समाजातील अगदी वेगळ्यावेगळ्या वर्गांसाठी सुद्धा त्यांना उपयोगी पडेल, अशा रीतीने संस्कृत भाषा शिकवली जाते. उदाहरणार्थ, कोरोनामुळे सध्या सर्वत्र ऑनलाइन काम चालतं त्यामुळे इलेक्ट्रॉनिक इंजिनीअर्सना संस्कृत भाषा शिकण्याची गरज निर्माण झाली, आयुर्वेदिक वैद्यांना संस्कृत भाषा शिकवणं, संस्कृत शिक्षकांना संभाषणीय संस्कृत शिकवणं, आयुर्वेदात असंख्य ग्रंथ संस्कृतमध्ये लिहिलेले आहेत; परंतु आयुर्वेदिक डॉक्टरचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून घेतलं जातं. आयुर्वेदिक वैद्यांनी संस्कृत भाषेतील हे ग्रंथ वाचले पाहिजेत, यासाठी आयुर्वेदिक डॉक्टरांना संस्कृतवर्गातून शिकवलं जातं. त्याशिवाय प्रशासकीय सेवेतील लोक ज्यांना संस्कृतीची माहिती असणे गरजेचे आहे, असे लोकप्रशिक्षण घ्यायला येतात. एमपीएससी, यूपीएससी परीक्षा देणारे विद्यार्थीही संस्कृत शिक्षण घेण्यासाठी येतात. लष्करात जायला उत्सुक मुलांनाही संस्कृत शिकण्याची गरज असते. संभाषणवर्गापासून विविध परीक्षांमार्फत देशभरात एक कोटीहून अधिक जण संस्कृत भारतीशी जोडले गेले आहेत.
इंग्रजी माध्यमातून आपण इंग्रजी ही ‘भाषा’ म्हणून शिकतो. तशीच संस्कृत माध्यमातून संस्कृत भाषा शिकवावी, यासाठी गेली पंचवीस वर्षं संस्कृत भारतीतर्फे प्रयत्न केले जात आहेत. नुकतंच महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळातर्फे आठवी ते बारावीच्या पुस्तकांमध्ये बदल करण्यात आला, त्यावेळी संस्कृतमधून संस्कृत शिकवण्यासाठीही पुस्तक तयार केलं गेलं आहे, असं पश्चिम मध्य क्षेत्र संयोजक माधव केळकर यांनी सांगितलं. माधव केळकर महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्या समितीमध्ये कार्यरत आहेत. ही पुस्तकं बदलल्यानंतर राज्यभरातल्या संस्कृत शिक्षकांना प्रशिक्षण देण्याची गरज होती. ते प्रशिक्षणही संस्कृत भारतीतर्फे देण्यात आले आहे.
रामटेकचं कालिदास विद्यापीठ आणि संस्कृत भारती यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांसाठी सलग दहा दिवस दररोज तीन तास अशी दहा सत्र देण्यात आली. या प्रशिक्षणाचा लाभ राज्यातल्या साडेसातशे ते आठशे शिक्षकांनी घेतला. त्यानंतर ११वी, १२वीचा अभ्यासक्रम बदलल्यावर कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना शिकवण्याचाही उपक्रम हाती घेण्यात आला. त्यातही जवळजवळ ८० शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात आलं. पदवी-पदव्युत्तर शिक्षकांची ही कार्यशाळा घेतली गेली. इतर सर्व उपक्रम विविध शाळा, मंडळ, संस्था यांच्याशी संपर्क साधून आयोजित केले जातात. खरंतर, संस्कृत आपली मूळ प्राचीन भाषा आहे; परंतु शिक्षण पद्धतीमध्ये मात्र संस्कृतला ऑप्शनल विषयात टाकण्यात आलं आहे, अशी खंत केळकर व्यक्त करतात.
संस्कृत भारतीतर्फे देशभरातल्या सर्व प्रांतांमध्ये दरवर्षी संस्कृत सप्ताह, कालिदास दिवस, वाल्मिकी जयंती साजरा केली जाते. त्यावेळी विविध प्रकारची व्याख्याने, स्पर्धा, शिबीर आयोजित केली जातात. खरंतर, संस्कृतमध्ये सर्वच क्षेत्रातील दुर्मीळ ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. उदाहरणार्थ, अभियांत्रिकी दिनाला अभियांत्रिकीवर आधारित ग्रंथाविषयी व्याख्यान. आयआयटी खरगपूरमधील संस्कृतप्रेमी प्राध्यापक ज्यांनी भारद्वाज, कणाद वाचलेला असतो, ते प्राचीन भारतीय अभियांत्रिकी या विषयावर व्याख्यान देतात. कणाद असेल, वराहमिहीर असेल यांनी जलसंधारण किंवा भूकंपशास्त्रावर देखील लिखाण केलं आहे. संस्कृत भाषेतून सर्व प्रकारचे ज्ञान उपलब्ध आहे, पण संस्कृत भाषा येत नसल्यामुळे त्याचं वाचन होत नाही म्हणून संस्कृत एक भाषा म्हणून आपल्याला माहीत असायला हवी. खरं तर, या सर्व गोष्टी आपल्या अभ्यासक्रमात अंतर्भूत व्हायला हव्यात. मुलांना लहान वयापासूनच भूगोलात भूकंपाबद्दलची वैज्ञानिक माहिती मिळाली, तर किती बरं होईल?
त्यामुळे आता संस्कृत भाषेच्या पाठ्यपुस्तकात कणाद यावर एक धडा घेतला आहे. निदान मुलांना कणाद कोण होता आणि त्याची ग्रंथसंपदा काय आहे, ही तरी माहिती कळेल, असं केळकर यांनी सांगितलं. अशा तऱ्हेचे मूलभूत काम करण्याचा प्रयत्न संस्कृत भारतीचे काही कार्यकर्ते तळमळीनं करत आहेत. फक्त बेगडी संस्कृतप्रेम दाखवून संस्कृत भाषा पुढे जाणार नाही, त्यासाठी मूलभूत प्रश्नावर काम करण्याची गरज आहे. त्यावरही थोडंफार कामही विद्यापीठांच्या तसेच काही संस्थांच्या मदतीने चालवलं जातं. संस्कृत भारतीचं आणखी एक काम म्हणजे संस्कृत भाषा संस्कृतमधून शिकवण्यासाठी अभ्यासक्रम तयार करून वर्ग घेतले जातात. केंद्र सरकारने अलीकडचे जे नवशैक्षणिक धोरण तयार केलं आहे, त्यामध्ये त्याची नोंद घेण्यात आली आहे. या नवीन शैक्षणिक धोरणाच्या निमित्ताने तिरुपती विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेमिनार घेण्यात आले होते.
संस्कृत भारतीचा स्वत:चा प्रकाशन विभाग असून अगदी लहान मुलांपासून थोरांपर्यंत, बालकथांपासून व्याकरणशुद्धीपर्यंत सर्वांना उपयोगी पडतील, अशा पुस्तकांचं प्रकाशन इथे होत असतं. त्याशिवाय ऑडियो, व्हीडिओ क्लिपसही आहेत. संस्कृत भारतीचा विदेश विभागही आहे. अनेक देशांमध्ये संस्कृत भारतीचे काम चालतं. अगदी दुबईमध्ये सुद्धा वर्ग घेतले जातात. संस्कृत, योग आणि गीता असे संयुक्त वर्ग ‘संयोगी’ या नावानं काही ठिकाणी चालतात. संस्कृत परिवार योजना आणि संस्कृत ग्रामयोजना हे अभिनव उपक्रमही राबवले जातात, याद्वारे एक संपूर्ण कुटुंब संस्कृत बोलणार, एक संपूर्ण गाव संस्कृतमध्ये संभाषण करणार, अशी योजना आहे. कर्नाटकमधील मत्तुर जिल्ह्यातील गावागावांमध्ये संभाषणामध्ये संस्कृतचा वापर होऊ लागला आहे. “देववाणी, अमृतवाणी, संस्कृत वाणी” सर्वांना कळावी आणि संस्कृत भाषेतील प्रचंड ग्रंथसंपदेतील ज्ञान, जे संस्कृत कळत नाही म्हणून लोक वाचू शकत नाहीत, ते लोकांना वाचता यावे, यासाठी खरंच संस्कृतचा प्रसार होण्याची गरज आहे. संस्कृत भारती विविध उपक्रमांतून ते सातत्याने करत आहे.