Tuesday, July 16, 2024
Homeताज्या घडामोडीबंदमुळे मुंबईकरांचे हाल

बंदमुळे मुंबईकरांचे हाल

व्यापारी, नोकरदार, सर्वसामान्यांमध्ये नाराजी

सीमा दाते

मुंबई : उत्तर प्रदेशातील लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मुंबईत अनेक ठिकाणी बंद पाळला गेला असला तरी काही ठिकाणी महाविकास आघाडी किंवा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जबरदस्ती व्यापाऱ्यांची दुकाने बंद केली. बस कमी असल्याने कामावर जाणाऱ्यांचे हाल झाले. तर व्यापारी, सर्वसामान्यांमध्ये नाराजी उमटलेली पहायला मिळाली.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने बंद केला; मात्र या बंदमुळे मुंबईतील सर्वसामान्यांचे हाल झाले. मुंबईतील विविध भागात आंदोलनकर्त्यांकडून बेस्ट बसची तोडफोड करण्यात आली. एकूण ९ बेस्टच्या बसची तोडफोड करण्यात आल्याचे समजते. यात बेस्टच्या मालकीच्या ८ आणि भाडेतत्वावरील १ अशा नऊ बसची तोडफोड करण्यात आली. मानखुर्द, मालाड, धारावी, ओशिवरा, शिवाजी नगर, चारकोप, इनोर्बीट मॉल या विविध ठिकाणी बसची तोडफोड करण्यात आली. यामुळे बेस्ट प्रशासनाने परिस्थिती पाहून बेस्ट रस्त्यावर सोडण्याचा निर्णय घेतला. याचा परिणाम सकाळी कामावर जाणाऱ्या नोकरदार वर्गावर पाहायला मिळाला. बेस्ट बस नसल्यामुळे अनेकांना कामावर जायला उशीर झाला; तर टॅक्सी, रिक्षा, खासगी वाहनांनी प्रवास करावा लागला. त्यामुळे वेळ आणि अतिरीक्त खर्च देखील झाला.

तर दुसरीकडे सकाळ पासून इस्टर्न एक्सप्रेस हायवेवर नेहमी प्रमाणे वाहनांची वर्दळ झाली. बेस्ट बस बंद केल्यामुळे अनेकांनी खासगी तसेच स्वतःच्या वाहनांनी प्रवास करणे पसंत केले. असे असताना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून इस्टेर्न एक्सप्रेस मार्गावर टायर जाळण्यात आले. यामुळे अर्धा तास इस्टर्न एक्सप्रेस मार्गावरील वाहतूक बंद होती. ठाण्याकडे जाणारी आणि मुंबईकडे जाणारी या दोन्ही मार्गावरील वाहतूक बंद असल्यामुळे सामान्य नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. अनेकांना कामावर जाण्यास उशीर झाला तर या बंदमुळे मानसिक त्रासही मुंबईकरांना सहन करावा लागला.

दरम्यान मुंबईतील काही दुकाने महाविकास आघाडी किंवा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून जबरदस्ती बंद करण्यात आली. सकाळी नेहमीप्रमाणे दादरमध्ये भाजीविक्रेते किंवा काही दुकाने सुरू होती. मात्र शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ती दुकाने जबरदस्तीने व्यापाऱ्यांना बंद करायला लावली. त्यामुळे व्यापारांचा देखील संताप झाला होता. आधीच लॉकडाऊनमुळे नुकसानीत असल्याने सोमवारी पुन्हा नुकसान सहन करावे लागले. त्याचबरोबर पश्चिम उपनगरातील कांदिवली आणि मालाडमध्येही शिवसेना कार्यकर्त्यांनी दुकानदारांना दमदाटी करत दुकाने बंद करण्याचे प्रयत्न केले. मात्र आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी तो प्रयत्न हाणून पाडला.

‘बेस्टला नुकसानभरपाई द्या’

मुंबईत बंदमुळे बेस्टच्या ८ बस फोडण्यात आल्या आहेत. तर दिवसभर बेस्टगाड्या बंद असल्यामुळे बेस्ट उपक्रमाचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे आघाडी सरकारने बेस्टची नुकसानभरपाई देण्याची मागणी भाजपचे बेस्ट सदस्य सुनील गणाचार्य केली आहे. बंदच्या दरम्यान बेस्टच्या ८ बसची तोडफोड करण्यात आली असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून बसची तोडफोड करणाऱ्या लोकांना शोधून त्यांच्याकडून नुकसानभरपाई वसूल करावी, तर सोमवारी दिवसभर बेस्ट बस बंद राहिल्याने बेस्टचे सुमारे सव्वादोन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. हे सर्व नुकसान राज्य सरकारने भरून द्यावे, अशी मागणी सुनील गणाचार्य यांनी केली आहे.

निम्म्याच बस रस्त्यावर

बेस्ट प्रशासनाकडून आलेल्या माहितीनुसार सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत १००८ बस चालवण्यात आल्या. म्हणजे नेहमीपेक्षा निम्म्या बस चालवण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाल्याचे पाहायला मिळाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -