नवी दिल्ली : पाकिस्तानच्या एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान, त्याच्याकडून एके -४७ रायफल जप्त करण्यात आली आहे. मोहम्मद अशरफ अली असे या दहशतवाद्याचे नाव आहे. तो ओळख लपवून १५ वर्षांपासून दिल्लीच्या लक्ष्मी नगर भागात राहत होता. अशरफ अली मौलाना म्हणून तो येथे राहत होता.
दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने सोमवारी ही कारवाई केली. दहशतवाद्याकडून शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. त्याने ही शस्त्रे वाळूमध्ये लपवून ठेवली होती. पोलीस उपायुक्त प्रमोद सिंग कुशवाह यांनी सांगितले की, पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात राहणारा मोहम्मद अशरफ उर्फ अली याने बनावट कागदपत्रांद्वारे भारतीय ओळखपत्र मिळवले होते. तो भारतीय नागरिक म्हणून दिल्लीत राहत होता. त्याच्याकडून एके -४७ रायफल, इतर शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला.
दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना स्वतः विशेष कक्षाच्या कारवाईवर लक्ष ठेवून होते. सणासुदीच्या अगोदर स्पेशल सेलने दहशतवादाची एक मोठी योजना उधळून लावली आहे, असे अस्थाना म्हणाले.