Wednesday, July 3, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेठाण्यात दोन दिवसांपासून कचरा उचलण्याचे काम बंद

ठाण्यात दोन दिवसांपासून कचरा उचलण्याचे काम बंद

घंटागाड्यांचाही संपात सहभाग, ठेकेदार-प्रशासन वाद

ठाणे (वार्ताहर) : ऐन नवरात्रीच्या काळात शहरातील नौपाडा व उथळसर प्रभाग समितीच्या हद्दीत घंटागाड्यांकडून कचरा उचलणे बंद करण्यात आले असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे महाराष्ट्र बंदमध्ये अत्यावश्यक सेवा असलेल्या घंटागाड्याही बंद ठेवण्याचा प्रताप करण्यात आला. तसेच, दुसऱ्या दिवशी ठेकेदार व प्रशासनाच्या वादातून घंटागाड्या बंद असल्यामुळे सोसायट्यांमध्ये व रस्त्यावर कचरा साचला आहे.

अनेक ठिकाणी रस्त्यावर कचरा पडला आहे. दरम्यान, या गंभीर प्रकाराकडे भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी लक्ष वेधले असून महापालिका प्रशासनाने दखल न घेतल्यास महापालिका मुख्यालयात कचरा टाकण्याचा इशारा दिला आहे.

महापालिकेच्या नौपाडा व उथळसर प्रभाग समितीतील इमारतींमधील कचरा उचलण्याचे काम घंटागाडी कंत्राटदारावर सोपवण्यात आले आहे. मात्र, घंटागाडीच्या ठेकेदाराची मुदत संपली असून नवा करारही करण्यात आला नाही. त्यामुळे ठेकेदार व प्रशासनामध्ये वाद सुरू आहे. दुसरीकडे, कचरा उचलणेही अत्यावश्यक सेवा आहे. मात्र, वाद सोडवण्याकडे महापालिका अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यातच महाराष्ट्र बंदचे निमित्त साधत घंटागाड्या बंद ठेवण्यात आल्या. दरम्यान, मंगळवारीही घंटागाड्याच बंदच होत्या.

परिणामी नौपाडा व उथळसर परिसरातील शेकडो इमारतींमध्ये कचऱ्याचे डबे भरून पडले आहेत. त्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसांतच सोसायट्यांमध्ये दुर्गंधी पसरू लागली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावरही कचरा पडून आहे. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत असल्याकडे भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी लक्ष वेधले.

घंटागाडी ठेकेदाराबरोबरील वाद सोडवण्यासह कचरा उचलण्याची सेवा बंद होऊ नये, यासाठी कटाक्षाने लक्ष देण्याची आवश्यकता होती. मात्र, त्याकडे महापालिकेतील अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष करण्यात आले. या प्रकाराची गंभीर दखल न घेतल्यास महापालिका मुख्यालयात कचरा टाकण्यात येईल, असा इशारा पवार यांनी दिला आहे.

घंटागाडी संपाला जबाबदार अधिकारी कोण?

उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला. मात्र, घंटागाड्यांनीही संपात सहभाग घेतल्यामुळे हजारो ठाणेकरांना दुर्गंधीत राहावे लागत आहे. संप उत्तर प्रदेशसाठी, अन् फटका ठाणेकरांना अशी स्थिती निर्माण झाली, अशी टीका भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केली. अत्यावश्यक घंटागाडी सेवेच्या बंदला महापालिकेतील जबाबदार अधिकारी कोण, असा सवाल नारायण पवार यांनी विचारला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -