निलेश कासाट
कासा : गेल्या दोन वर्षांपासून बळीराजा संकटात सापडला आहे. या वर्षीही पुन्हा परतीच्या पावसाने हातीतोंडी आलेला घास हिरावला आहे. पावसाळा लांबल्याने भातपीक कापणी खोळंबली होती. त्यात रोज संध्याकाळी वारा, विजेच्या कडकडाटाने जोरदार पाऊस पडून कापणीस आलेल्या व शेतात कापून ठेवलेल्या भातपिकांचे पाऊस नुकसान करत आहे.
पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, विक्रमगड, वाडा, पालघर आदी तालुक्यांतील शेतकरी मोठ्या प्रमाणात भातशेती करत असून सध्या तयार झालेले भातपीक कापणीस सुरुवात झाली आहे. दोन वर्षांपासून शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. उशिरा सुरू झालेल्या पावसामुळे त्यात कोरोना प्रादुर्भावामुळे आर्थिक टंचाई असलेल्या शेतकऱ्यांना भातशेती करण्यास मोठे कष्ट पडत आहेत. वाढलेले भाव खत, बी बियाणे, मजुरी यांना सांभाळत शेती लावली. त्यात भातपिकांवर आलेल्या रोगाने काही प्रमाणात नुकसान केले. आता सध्या हाती काही लागेल म्हणून भातपीक कापणी सुरुवात केली आहे, तर या पडणाऱ्या पावसामुळे भात शेती भिजून सर्व पिकांचे नुकसान झाले आहे. काहीतरी हातात लागेल म्हणून शेतकरी भातपिके वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.
आज पिके भिजल्याने पेंढा, पावलीसुद्धा हातातून नाहीशी होत आहे. गुरे, जनावरांना वैरण घालावी तरी काय आणि स्वतःच्या पोटासाठी दाणापाणी आणावा कुठून या चिंतेत येथील शेतकरी पडला आहे. त्यामुळे पुन्हा प्रशासनाकडे नुकसानभरपाई मिळेल, याची वाट पाहत शेतकरी बसला आहे. शेताच्या बांधावर कापलेले पीक वाचवण्यासाठी बळीराजा प्रयत्न करत होता. पण परतीचा पाऊस एवढा जोरदार सुरू झाला की होते नव्हते ते पीक खराब झाले. त्यामुळे तत्काळ मदत मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
हातीतोंडी आलेले पीक यावेळी नष्ट झाल्यावर जगावे कसे, या चिंतेत आम्ही आहोत. यावर्षी चांगले पीक आले होते. पीक कापणीस तयारही होते. काही पीक कापून ठेवले होते, पण या पावसाने भिजून भात पिकाला कोंब आले असून कुजून गेले आहे. प्रशासनाने आता तत्काळ मदत दिली पाहिजे. – तानाजी कासट, शेतकरी
भातपिकाला आले कोंब
सतत पडणारा परतीचा पाऊस व त्यातच वारा यामुळे शेतातील भात पूर्णपणे आडवे झाले आहे. शेतात पाणी असल्याने तयार झालेले भाताचे दाणे पाण्यात भिजून भाताला कोंब आले आहेत. त्यातच भाताचा पेंढाही कुजला असून ना तो विकता येत, ना गुरांसाठी खायला टाकता येत. त्यामुळे शेतकऱ्यांनी वर्षभर केलेल्या मेहनतीवर अक्षरश: पाणी पडत आहे.