Sunday, July 14, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेहंडे-कळशा आपटत हक्काच्या पाण्याची मागणी

हंडे-कळशा आपटत हक्काच्या पाण्याची मागणी

पाणीटंचाईने नागरिक त्रस्त

मीरा रोड (वार्ताहर) : मीरा-भाईंदर शहराला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन फुटल्यामुळे गेल्या तीन ते चार दिवसांपासून शहरात पाणी आले नसल्यामुळे शहरातील नागरिक पाणीटंचाईने त्रस्त झाले आहेत. मीरा-भाईंदरमध्ये तीन दिवसांच्या कालावधीनंतर मंगळवारी सकाळी काही परिसरात पाणी आले आहे. मात्र, अनेक ठिकाणी अद्यापही पाणी आलेले नाही. मीरा रोड पूर्वच्या ओल्ड पेट्रोल पंपच्या समोर असणाऱ्या क्लासिक काऊंटी कॉम्प्लेक्समधील सर्व रहिवासी मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास घरातील हांडे-कळशा घेऊन हक्काच्या पाण्याकरिता खाली उतरून मीरा-भाईंदर महानगरपालिकेला पाणी प्रश्न लवकरात लवकर सोडवावा, अशी विनंती करत होते.

महिलांचे पाणीटंचाईने अनेक हाल होत असल्यामुळे त्यांनी त्यांचा राग हांडे-कळशा आपटून व्यक्त केला. सोसायटीमध्ये राहणाऱ्या रेश्मा तपासे यांनी सांगितले की, दर महिन्याला पिण्याकरिता व घरगुती कामाकरिता पाणी विकत घेण्याकरिता जवळपास सहा ते सात हजार रुपये मोजावे लागतात. कोरोनाच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यात हा खर्च कसा उचलायचा, असा प्रश्न सामान्यांना पडला असून पालिकेने याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावे अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत बहिष्कार घातल्याशिवाय पर्याय उरलेला नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

मीरा-भाईंदर शहराला एमआयडीसीकडून पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन दुरुस्तीचे काम करण्यासाठी शुक्रवारी पुरवठा बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर शनिवारी पाणीपुरवठा सुरू करताच कल्याण शीळ, फाटा येथे सकाळी ७.३०च्या आसपास पाइपलाइन फुटली होती.

पाइपलाइनचे खिडकालेश्वर मंदिरासमोर आणि देसाईगाव अशा दोन ठिकाणी काम सुरू होते. हे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा जांभळी येथे पाइपलाइन लिकेज झाली. त्यामुळे मीरा-भाईंदर शहरात गेल्या चार दिवसांपासून अनेक भागात पाणी आले नाही.

रविवार व सोमवार या दिवशी, तर दुकानदार व टँकरचालक यांनीही नागरिकांची पिळवणूक करत पाण्यासाठी जास्त पैसे घेत असल्याचे अनेक नागरिकांनी सांगितले आहे. नागरिकांना भरपावसात पाणी मिळत नसल्याने मनपा प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -