Thursday, July 25, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेसंकटग्रस्त शेतकरी, व्यापाऱ्यांना वाऱ्यावर का सोडले?

संकटग्रस्त शेतकरी, व्यापाऱ्यांना वाऱ्यावर का सोडले?

भाजपचा ठाकरे सरकारला सवाल

ठाणे (प्रतिनिधी) : उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांविषयी कळवळा दाखविणाऱ्या ठाकरे सरकारने महाराष्ट्रातील संकटग्रस्त शेतकरी, व्यापारी, किरकोळ वस्तूंचे विक्रेते आणि सामान्य जनतेला वाऱ्यावर का सोडले, असा सवाल भाजपचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी पत्रकाद्वारे केला आहे.

महाराष्ट्रातील शेतकरी, व्यापारी आणि सामान्य जनता संकटांमध्ये होरपळत असताना, उत्तर प्रदेशातील जनतेचे तारणहार असल्याच्या आविर्भावात मंत्रिमंडळाच्या बैठकीत शोकप्रस्ताव संमत करणे, ही ठाकरे सरकारची निव्वळ ढोंगबाजी आहे. लखीमपूर प्रकरणाच्या ढालीआडून महाराष्ट्र बंद पुकारून जनतेचे लक्ष अन्यत्र वळविण्याचे राजकारण ठाकरे सरकार करत आहे, असा आरोपही डावखरे यांनी केला आहे.

वादळे, अतिवृष्टी, दुष्काळ, महापूर अशा संकटात महाराष्ट्रातील शेतकरी व जनता त्रस्त असताना, केवळ मदतीच्या कोरड्या आश्वासनांपलीकडे सरकारने काहीही दिलेले नाही. गेल्या वर्षीच्या निसर्ग आणि या वर्षीच्या तोक्ते वादळात नुकसान झालेल्यांना सरकारने जाहीर केलेली मदतही अजून शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचलेली नाही. रायगड जिल्ह्यात दरड कोसळल्यामुळे उद्ध्वस्त झालेली जनता अजूनही मदतीची वाट पाहत आहे.

शेतकरी सरकारी मदतीची वाट पाहत आहे आणि ठाकरे सरकार उत्तर प्रदेशातील घटनांची काळजी दाखवत आहे. लखीमपूर खेरीमध्ये काय झाले, त्यावर काय कारवाई करायची, ते पाहण्यास उत्तर प्रदेश सरकार सक्षम आहे. ही घटना दुर्दैवी आहे, पण महाराष्ट्रात रोज शेतकऱ्याचे मरण ओढवत असताना त्यावर मात्र ठाकरे सरकार चकार शब्द बोलत नाही. ठाण्यातील व्यापाऱ्यांना एका दमडीचीही राज्य सरकारने मदत केली नाही. सतत निर्बंध लादण्यात आले. अनेक व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली. मात्र, महाविकास आघाडी सरकारला व्यापाऱ्यांपेक्षा लखीमपूर खेरीवर जास्त रस आहे. मंत्रिमंडळात मात्र लखीमपूर घटनेवर राजकारण केले जाते, हा केवळ राजकीय स्टंट आहे. ज्यातील संकटग्रस्तांना वेठीस धरू नका, असा इशाराही डावखरे यांनी दिला.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत लखीमपूर घटनाग्रस्तांना श्रद्धांजली वाहणाऱ्या ठाकरे सरकारला महाराष्ट्रातील संकटांमध्ये मृत्यू पावलेले शेतकरी, व्यापारी आणि सामान्य जनता आठवली नाही का, त्यांच्यासाठी श्रद्धांजलीचे दोन शब्द सरकारने मंत्रिमंडळात का काढले नाहीत, असा सवाल त्यांनी केला. अगोदरच कोरोनाकाळात कंबरडे मोडलेल्या महाराष्ट्रात बंद पुकारून जनतेच्या हलाखीत या राजकारणामुळे भर पडणार आहे, असेही आमदार डावखरे म्हणाले.

सरकारी यंत्रणांचा बंदसाठी वापर

महाविकास आघाडी सरकारने सरकारी यंत्रणेचा बिनदिक्कतपणे बंदसाठी वापर केला. पोलिसांकडून व्यापारी संघटनांना फोन करून दुपारपर्यंत दुकाने बंद ठेवण्यास सांगण्यात आले. तर एमआयडीसीकडून उद्योग बंद ठेवण्याचे आदेश दिले जात होते. `टीएमटीची एकही बस रस्त्यावर उतरली नाही. सामान्य जनतेचे हालाकडे दुर्लक्ष करण्यात आले, अशी टीका आमदार निरंजन डावखरे यांनी केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -