Tuesday, July 23, 2024
Homeमहत्वाची बातमीमहाराष्ट्र बंदला भाजपचा विरोध

महाराष्ट्र बंदला भाजपचा विरोध

व्यापारी व शेतकऱ्यांना सहभागी न होण्याचे आवाहन

मुंबई/नगर (प्रतिनिधी) : महाविकास आघाडी सरकारच्या महाराष्ट्र बंदला भाजपने विरोध दर्शवला आहे. या बंदमध्ये व्यापारी व शेतकऱ्यांनी सहभागी होऊ नये, असे आवाहन पक्षातर्फे करण्यात आले आहे.

लखीमपूरमधील एका घटनेचे राजकीय भांडवल करण्याचा ढोंगीपणा हे लोक करत आहेत. आधीच टाळेबंदी करून यांनी मुंबईकरांची रोजी-रोटी संपवली होती. त्यातलाच हा आणखी एक प्रकार आहे. मात्र, मुंबईत भाजप प्राणपणाने या बंदला विरोध करेल. कुणी सरकारी दडपशाही करून किंवा पक्षीय दडपशाही करून मुंबईकरांना त्यांचे व्यवहार बंद करण्याचा प्रयत्न केला, तर भाजप रस्त्यावर उतरून याला विरोध करेल, असे भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी रविवारी स्पष्ट केले. उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून मारण्याच्या घटनेविरोधात महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने सोमवारी, ११ ऑक्टोबरला राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे.

आघाडीतर्फे पुकारण्यात येणाऱ्या बंदमध्ये शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी सहभागी होऊ, नये असे आवाहन भाजपचे नगर जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांनी केले आहे. शरद पवार मुख्यमंत्री असताना गोवारी हत्याखंड झाले होते. तसेच मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळीबार झाला होता. ही घटना महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. बंद पुकारणाऱ्या पक्षांकडून शेतकऱ्यांवर सतत अन्याय झाला आहे. सध्याही शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होऊनही या सरकारने शेतकऱ्यांना मदत केलेली नाही. उलट थकीत बिलांच्या पैशासाठी शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे. जळालेली रोहित्र बदलून मिळत नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांनी महाविकास आघाडीच्या बंदमध्ये सहभागी होऊ नये, असेही त्यांनी म्हटले आहे.

गेली दोन वर्षे कोरोनाने हैराण झालेल्या व्यापाऱ्यांना आता कोठे पूर्ण वेळ दुकाने उघडी ठेवून व्यवसाय करण्याची परवानगी मिळाली आहे. तोटा भरून काढण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. सणासुदीच्या दिवसांत व्यवसाय सावरत आहेत. अशातच बंद पुकारण्यात आल्याने पुन्हा व्यवसायाला खीळ बसणार आहे. व्यवसाय वाढीला चालना देण्याऐवजी बंदमध्ये सहभागी करून घेत व्यापाऱ्यांचे नुकसान केले जात आहे, त्यामुळे व्यापाऱ्यांनी यामध्ये सहभागी होऊ नये,’ असे मुंडे यांनी म्हटले आहे.

अत्यावश्यक सेवांना वगळले

आघाडी सरकारच्या महाराष्ट्र बंदमधून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. रुग्णवाहिका, दूध आणि इतर आवश्यक वस्तूंची वाहतूक सोडून हा बंद पाळला जाईल, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

दुकानदारांना बंदमध्ये खेचू नका : वीरेन शहा

बंदमध्ये दुकानदारांना खेचू नका, असे आवाहन विरेन शहा यांनी केले आहे. आमचा शेतकऱ्यांना पाठिंबा आहे. मात्र, उद्या दुकाने सुरू राहतील. कोरोनानंतर बऱ्याच वेळाने दुकाने सुरू झाली आहेत. सध्या नोकरांचा पगार देणंसुद्धा जििकरीचे झाले आहे, असे शहा यांनी सांगितले. मुंबई व्यापार संघाची भूमिका त्यांनी माडली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -