वाडा (वार्ताहर) : पालघर जिल्ह्यातील पोटनिवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. प्रचारादरम्यान कार्यकर्त्यासह मंत्री भिवंडी-वाडा-मनोर रस्त्यावरून प्रवास करत होते. मात्र, प्रचारात कुठेही रस्त्यांची कामे मार्गी लावतोय, असे भाषणातून ऐकायला मिळाले नाही. दरम्यान, आता निवडून आलेल्या शिवसेना व राष्ट्रवादीकडून वाड्यातील विकासाची कामे मार्गी लागतील, अशी अपेक्षा सर्वसामान्य व्यक्त करत आहेत.
अनेक प्रश्नांपैकी सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे भिवंडी-वाडा-मनोर रस्त्याची खड्ड्यांमुळे झालेली चाळण. आजवर शेकडो आंदोलने झाली. रास्तारोको, बांधकाम खात्यातील अधिकाऱ्यांना खड्ड्यात उभे करणे झाले. निवेदने दिली, मात्र प्रतिसाद देईल ते कसले बांधकाम खाते, असा आरोप स्थानिक करत आहेत. दुसरीकडे, आजवर केवळ या रस्त्याच्या दुरूस्तीवर हजारो कोटी रुपये खर्च झाले आहेत. परंतु, सदर रस्ता खड्ड्यातच आहे. मग हा दुरूस्तीवरचा पैसा नेमकी कुठे जात आहे, असा प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत.
वाड्यात रस्ते, पाणी या प्रश्नांबरोबर बेरोजगारी हा प्रश्न भेडसावत आहे. कारखाने आले, मात्र त्यांना पाणी, रस्ते आणि वीज पुरेशा प्रमाणात मिळत नाही. स्थानिक युनियनमुळे कंपन्या बंद अथवा स्थलांतरित होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच, नाका परिसरात रस्त्यावरील अतिक्रमण वाढत असून वाहतुकीला अडथळा ठरत आहेत, पण यांना पोलिसांची भीती वाटत नाही, की ग्रामपंचायत कारवाई करत नाही. असे अनेक प्रश्न आहेत आता नव्यानेच निवडून आलेल्या सदस्यांनी या प्रश्नांवर विचार करून योग्य ती कारवाई करावी व या समस्या सोडवाव्यात याकडे नागरिकांच्या नजरा लागल्या आहेत.