Sunday, July 14, 2024
Homeसाप्ताहिककोलाजलखीमपूर; सहानुभूती की भांडवल?

लखीमपूर; सहानुभूती की भांडवल?

स्टेटलाइन : सुकृत खांडेकर

उत्तर प्रदेशमधील लखीमपूर-खेरीमध्ये झालेल्या हत्याकांडाने भाजप विरोधकांना आक्रोश करायला एक नवे हत्यार प्राप्त झाले. लखीमपूरमध्ये घडले ते अतिशय दुर्दैवी होते. ज्या निरपराध शेतकरी व भाजपच्या कार्यकर्त्यांचे बळी पडले त्याला नेमके कोण जबाबदार आहेत, हे पोलीस आणि न्यायालयीन चौकशीत बाहेर येईल. पण या घटनेनंतर काँग्रेस, सपा, बसप, तृणमूल काँग्रेस आदी राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या भेट देण्यासाठी रांगा लागल्या आहेत, त्या पाहता या घटनेला राजकीय रंग फासला जात आहे, हे लक्षात येते. लखीमपूरला लागलेल्या आगीत तेल ओतण्याचे काम काही जण करीत आहेत आणि ही आग धुमसत राहावी यासाठी काहींचा प्रयत्न चालू आहे. या घटनेचे राज्यावर व देशावर काय दुष्परिणाम होतील याची कुणाला फारशी पर्वा नाही. मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांनी राजीनामे द्यावेत, या एकाच मागणीचा भाजप विरोधकांनी घोशा लावला आहे.

हाथरसमध्ये बलात्कार करून हत्या केलेल्या निर्भयाच्या मृतदेहावर पोलिसांनी तिच्या परिवाराची संमती न घेताच परस्पर अंत्यसंस्कार केला होता. वर्षभरापूर्वी घडलेल्या घटनेने सारा देश हादरला होता. लखीमपूरमध्ये तर मंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या वेगवान मोटारीने शेतकरी आंदोलकांना चिरडून टाकले. या घटनेचे गांभीर्य ओळखून योगी आदित्यनाथ यांनी प्रशासन व शेतकरी नेते यांच्याबरोबर तत्काळ संवाद साधला. शेतकरी संघटनेच्या मागण्या मंजूर केल्या. लखीमपूरकांडाची चौकशी करण्याचे काम हायकोर्टाच्या निवृत्त न्यायमूर्तींकडे सोपविण्याचे जाहीर केले. मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना पंचेचाळीस लाख रुपये नुकसानभरपाई जाहीर केली. तसेच त्यांच्या परिवारातील एकाला शासकीय नोकरी देण्याचेही योगींनी आश्वासन दिले. शेतकरी नेते व सरकार यांच्यात या निर्णयावर सहमती झाली. आठवडाभरात दोषींना अटक करण्याचेही सरकारने आश्वासन दिले. अशा सर्व मुद्द्यांवर सरकार राजी झाले आणि शेतकरी संघटनांचेही समाधान झाले.

पण काँग्रेस आणि समाजवादी पक्षाला समाधान नाही, याचेच आश्चर्य वाटते. लखीमपूर घटनेचा राजकीय लाभ उठविण्यासाठी हे दोन्ही पक्ष कसोशीने प्रयत्न करीत आहेत. शेतकरी आंदोलनाची ढाल पुढे करून उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यात कोणी अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असेल, त्याचाही पोलिसांनी छडा लावला पाहिजे. केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून चौघांना चिरडून ठार केले, असा एक आरोप आहे. तसेच भाजपच्या तीन कार्यकर्त्यांना आंदोलकांनी मोटारीतून खाली खेचून बेदम मारहाण करून ठार केले, असाही आरोप आहेच. ज्या तीन शेतकरी कायद्यांना विरोध म्हणून गेले नऊ महिने दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन चालू आहे, त्या कायद्यांना सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

तोडगा सुचविण्यासाठी समिती नेमली आहे. मग शेतकरी कोणाच्या विरोधात आंदोलन करीत आहेत, असा प्रश्न न्यायालयानेच विचारला आहे. प्रजासत्ताक दिनाला दिल्लीच्या लाल किल्ल्यावर घुसून सशस्त्र आंदोलकांनी जो धुडगूस घातला, नंग्या तलवारी नाचवल्या, त्याबद्दल कोणत्याही संघटनेने आजवर जबाबदारी घेतलेली नाही. लखीमपूरला भाजपच्या कार्यकर्त्यांना खाली खेचून कोणी ठार केले, त्यासंबंधी कोणतीही संघटना ‘ब्र’ काढत नाही. आंदोलकांचे नेते शांततेची भाषा करीत असतात, पण हिंसाचार झाला की, त्याबद्दल बोलायला तयार होत नाहीत.

लखीमपूरला अशी घटना का घडली, हिंसाचार हा पूर्वनियोजित कट होता का, याचाही तपास झाला पाहिजे. केंद्रीय राज्यमंत्री व स्थानिक खासदार अजय मिश्रा यांना दोन आठवड्यांपूर्वी आंदोलकांनी काळे झेंडे दाखविले होते, तेव्हा मंत्रीमहोदयांनी, मी तुमच्या मागे लागलो, तर तुमची पळता भुई थोडी होईल, अशी त्यांनी धमकी दिली होती. केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा कार्यक्रमासाठी येत आहेत समजताच शेतकरी त्यांच्यापुढे निदर्शने करण्यासाठी पुन्हा निघाले होते. अजय मिश्रांवरील राग म्हणून हिंसाचार घडवला गेला का? शेतकरी आंदोलक व भाजप कार्यकर्ते यांच्यात बदला घेण्यापर्यंत मजल जाईल, याची पोलिसांना अगोदर कल्पना नव्हती का? मोटारीच्या ड्रायव्हरची, पत्रकाराची, भाजप कार्यकर्त्यांची हत्या कोणी केली?

ज्या मोटारीखाली चार आंदोलकांचा चिरडून मृत्यू झाला, त्या मोटारीत आपला पुत्र आशीष नव्हताच, असा दावा केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा यांनी केला आहे. व्हीडिओमध्ये क्लिपमध्ये मोटारीतून उडी मारून पळालेला दुसराच आहे व त्यानेही तशी प्रसार माध्यमांसमोर कबुली दिली आहे. मात्र पोलिसांनी एफआयआर नोंदवताना मंत्री पुत्र आशीष त्या मोटारीत असल्याची नोंद केली आहे. मग खरे काय, हे गूढ आहे.

लखीमपूरमधील हिंसाचाराचे पडसाद पिलभित, शहाँजहापूर, हरदोई, सीतापूर, बहराईच, या लगतच्या जिल्ह्यातही पडू शकतात, सीमेवरील या जिल्ह्यांमध्ये २०१७च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला भरोघोस यश मिळाले. या भागातील ४२ पैकी ३७ विधानसभा मतदारसंघांत भाजपचे आमदार निवडून आले आहेत.

लखीमपूर हा उत्तर प्रदेशातील सर्वात मोठा जिल्हा आहे. उच्चवर्णीय, विशेषत: ब्राह्मण समाजाचा येथे प्रभाव आहे. मुस्लीम, कुर्मी, शीख समाजही संख्येने मोठा आहे. राज्याच्या सीमेवरील सहा जिल्ह्यांत काँग्रेसचा एकही आमदार निवडून आलेला नाही. लखीमपूरमध्ये ज्या ठिकाणी हिंसाचार झाला व हत्याकांड घडले, तेथे १९९३पासून भाजपचा आमदार निवडून येत आहे.

लखीमपूर खेरी हा अजय मिश्रांचा गड म्हणून ओळखला जातो. यूपीमधील तेराई पट्ट्यातील ते शक्तिशाली नेते आहेत. टेणी महाराज म्हणून ते परिचित आहेत. खेरीमधून ते दोन वेळा खासदार झाले. राजकारणात येण्यापूर्वी ते व्यवसायाने वकील होते. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी सपाच्या उमेदवाराचा सव्वा दोन लाखांनी पराभव केला. केंद्र सरकारमधील यूपीचा ब्राह्मण चेहरा ही आणखी ओळख आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस प्रियंका वड्रा, पंजाबचे मुख्यमंत्री चरजितसिंग चन्नी, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बहेल यांनी मोठ्या लवाजम्यासह मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. मृतांच्या परिवाराला काँग्रेसच्या दोन्ही मुख्यमंत्र्यांनी प्रत्येकी एक कोटीची मदत जाहीर केली. ही मदत हिंसाचारात मरण पावलेल्या भाजप कार्यकर्त्यांनाही मिळणार का?

राहुल व प्रियंका गांधींच्या यूपी भेटीच्या वेळी लखनऊमध्ये शीख समाजाने फलक लावले होते.

नहीं चाहिए फर्जी सहानुभूती,
खून से भरा है दामन तुम्हारा,
तुम क्या दोंगे साथ हमारा,
नहीं चाहिए साथ तुम्हारा…

sukritforyou@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -