गोल्डकोस्ट (वृत्तसंस्था): भारताच्या महिला संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-ट्वेन्टी सामन्यात १४ धावांनी पराभूत व्हावे लागले. त्यामुळे यजमानांनी ही मालिका २-० अशा फरकाने खिशात घातली.
भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाने ५ विकेट गमावत १४९ धावा केल्या आणि विजयासाठी १५० धावांचे आव्हान दिले. मात्र भारतीय संघ २० षटकात ६ गडी गमवून १३५ धावा करू शकला. ऑस्ट्रेलियाकडून भारताचा १४ धावांनी पराभव झाला.
ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या धावांचा पाठलाग करण्यासाठी स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा ही जोडी मैदानात उतरली. या सामन्यातही शफालीची बॅट चालली नाही. अवघ्या १ धावसंख्येवर बाद झाली. त्यानंतर स्मृती आणि जेमिमा रॉड्रिग्स या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ५७ धावांचा भागीदारी केली. जेमिहा रॉड्रिग्स हीच्या रुपाने भारताला दुसरा धक्का बसला. ती २६ चेंडूत २३ धावा करून तंबूत परतली. स्मृतीने झुंज सुरुच ठेवली होती. ४९ चेंडूत ५२ धावा करून बाद झाली. त्यानंतर धावगती मंदावली आणि चेंडू आणि धावांचा फरक वाढला. हरमनप्रीत कौर १३, तर पूजा वस्त्रकार ५ या धावसंख्येवर बाद झाली. हरलीन देओल २ या धावसंख्येवर धावचीत झाली.
आघाडीला आलेल्या अलिसा हिली दुसऱ्या षटकात अवघ्या ४ धावा करून बाद झाली. रेणुका सिंगच्या गोलंदाजीवर ऋचा घोषने तिचा झेल घेत तिला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर बेथ मूनी आणि मेग लानिंग या जोडीनं डाव सावरला. मात्र संघाची धावसंख्या ४४ असताना लानिंग बाद झाली. १४ या धावसंख्येवर असताना राजेश्वरीच्या गोलंदाजीवर हिट विकेट झाली. त्यानंतर आलेली गार्डनरही जास्त काळ मैदानात तग धरू शकली नाही. अवघी एक धाव करत तंबूत परतली. असं असताना बेथ मूनीने एकाकी झुंज सुरुच ठेवली. एलिस पेरी ८ धावा करून बाद झाली. बेथ मूनी ४३ चेंडूत ६१ धावा करून राजेश्वरी गायकवाडच्या गोलंदाजीवर बाद झाली. या खेळीत तिने १० चौकार मारले.