Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रपालघरजि.प. माध्यमिक शाळा कवाडा ठाकरपाडा ठरली तंबाखूमुक्त शाळा

जि.प. माध्यमिक शाळा कवाडा ठाकरपाडा ठरली तंबाखूमुक्त शाळा

तलासरी (वार्ताहर) : तलासरी पंचायत समिती अंतर्गत कवाडा ठाकरपाडा (केंद्र झरी) या जिल्हा परिषद माध्यमिक शाळेने तंबाखूमुक्त अभियानाचे ९ निकष पूर्ण केले. त्यामुळे सलाम मुंबई फाऊंडेशन व नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्यच्यावतीने पालघर जिल्हा समन्वयक मिलिंद रूपचंद पाटील यांनी तंबाखूमुक्त शाळा म्हणून जिल्हा परिषद माध्यमिक शाळा कवाडा ठाकरपाडा शाळेचे नाव घोषित केले आहे.

जिल्हा परिषद शिक्षण विभाग पालघर, तंबाखू नियंत्रण उपक्रम कार्यक्रम, सलाम मुंबई फाऊंडेशन व नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा, खासगी शाळा, महाविद्यालयात तंबाखूमुक्त अभियान राबवण्यात आले आहे. यासाठी पालघर जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापकांची एक दिवसीय ऑनलाईन कार्यशाळा घेण्यात आली होती. यावेळी जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) लता सानप आणि (माध्यमिक) संगिता भागवत, तसेच पालघर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी यांनी आपल्या जिल्ह्यातील सर्व शाळा लवकरात लवकर तंबाखूमुक्त कराव्यात, असे आवाहन करण्यात आले होते.

सलाम मुंबई फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक जयेश माळी, सलाम मुंबई फाऊंडेशनचे प्रतिनिधी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचे पालघर जिल्हा समन्वयक मिलिंद रूपचंद पाटील, तलासरी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी के. बी. सुतार, झरी केंद्राच्या केंद्रप्रमुख संजय प्रधान यांच्या मार्गदर्शनाने कवाडा ठाकरपाडा शाळेचे मुख्याध्यापक (प्राथमिक) सुशिला सुधाकर तिरपुडे, प्रभारी मुख्याध्यापक (माध्यमिक) नवीन केशव धोडी, शाळा व्यवस्थापन समिती शाळा कवाडा ठाकरपाडा, पालकवर्ग व विद्यार्थ्यांच्या सहकार्याने सदर निकषांची पूर्तता केली.

सर्व पालक आणि विद्यार्थ्यांना तंबाखूमुक्तची शपथ दिली. तंबाखू नियंत्रणावर आधारित उपक्रम राबवले. शाळेच्या १०० मी. यार्ड परिसरात तंबाखू विक्री व सेवन करणाऱ्या व्यक्तीला दंड आकारण्यात येईल, याबाबत गावात जनजागृती केली. शाळेच्या १०० यार्डपर्यंत परिसर दिसेल, असा पिवळ्या रंगाने रेखांकित करून तेथे तंबाखूमुक्त क्षेत्र लिहून तंबाखूमुक्त क्षेत्र जाहीर केले व आपली शाळा तंबाखूमुक्त केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -