Wednesday, April 24, 2024
Homeताज्या घडामोडीस्वतंत्र रिक्षा स्टॅण्डचा प्रश्न कधी मार्गी लागणार?

स्वतंत्र रिक्षा स्टॅण्डचा प्रश्न कधी मार्गी लागणार?

अबोली रिक्षाचालक महिलांचा सवाल

कुणाल म्हात्रे

कल्याण : कल्याणमधील अबोली रिक्षाचालक महिलांनी प्रशासनाकडे स्वतंत्र रिक्षा स्टॅण्डची मागणी केली आहे. कल्याण, डोंबिवली स्टेशन पूर्व पश्चिम परिसरात स्वतंत्र रिक्षा स्टॅण्ड अबोली रिक्षांसाठी उपलब्ध व्हावे, जेणेकरून अबोली रिक्षाने प्रवास करू इच्छुक महिला प्रवाशांना ते सोयीचे होईल. दरम्यान स्वतंत्र रिक्षा स्टॅण्डचा प्रश्न मार्गी कधी लागणार, असा सवाल अबोली रिक्षाचालक महिलांनी केला आहे.
या संदर्भात पाठपुरावा करीत असून प्रशासनाकडून ठोस आश्वासन मिळत नसल्याचे अबोली रिक्षाचालक महिलांचे म्हणणे आहे.

महिला सक्षमीकरणाच्या वाटचालीसाठी महाराष्ट्र शासनाने महिलांना २०१७ मध्ये अबोली रिक्षा परवाना देण्यास सुरुवात केली. त्यानुसार कल्याण-डोंबिवली शहरात आजमितीस सुमारे ३० ते ३५ अबोली रिक्षा आहेत. मात्र, महिला रिक्षाचालकांना स्वतःचा रिक्षा स्टॅण्ड मिळालेला नाही. अबोली रिक्षा सुरू करताना मोठा गाजावाजा केला होता. कल्याण-डोंबिवली शहरात शेकडो अबोली रिक्षा फिरताना दिसतील व महिलांना सुरक्षित प्रवास करता येईल, अशा वल्गना शासकीय पातळीवर व लोकप्रतिनिधी यांनी केल्या होत्या. मात्र शासन व अधिकारी यांनी अबोली रिक्षा चालकांना प्रोत्साहन दिले नसल्याने अबोली रिक्षांची संख्या वाढली नाही.

प्रादेशिक परिवहन विभाग, वाहतूक पोलीस व कल्याण डोंबिवली महापालिकेने कल्याण-डोंबिवली शहरात पूर्व व पश्चिम विभागात अबोली रिक्षाचालकांनी कायमस्वरूपी रिक्षा स्थानक मिळण्यासाठी प्रशासनाकडे मागणी केली आहे.

कल्याण-डोंबिवलीत अबोली रिक्षा व्यवसाय करताना महिला रिक्षाचालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. सायंकाळी रेल्वे स्टेशन परिसरात प्रवासी घेण्यासाठी रांगेत उभे राहिल्यास एक ते दीड तास वाट पाहत रांगेतील रिक्षा ढकलावी लागते, त्यामुळे थकवा येतो. त्याचप्रमाणे वेळ जास्त लागत असल्यामुळे व्यवसाय हवा तसा होत नाही. रिक्षाचे बँकेचे हफ्ते फेडणे यातून घरखर्चाचा ताळमेळ कसा बसणार? तसेच कोरोना पार्श्वभूमीमुळे बिघडलेल्या अर्थिक घडीतून कसे सावरायचे, असे अनेक प्रश्न भेडसावत असल्याचे, अबोली रिक्षाचालक शारदा ओव्हळ यांनी सांगितले.

अबोली चालविण्यासाठी महिला पुढे येत नाहीत, यामुळे अबोली रिक्षाचालकांसाठी स्टॅण्ड राखीव ठेवल्यास महिला प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता येईल. यासाठी रिक्षा स्टॅण्ड आरक्षित ठेवावा, अशी मागणी अबोली रिक्षाचालक संघटनेचे अध्यक्ष संतोष भगत व कल्याण शहर महिला अध्यक्षा शारदा ओहळ यांनी पालिका प्रशासन, आरटीओ व वाहतूक पोलिसांकडे केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -