Thursday, March 28, 2024
Homeमहत्वाची बातमीमुंबई, ठाण्याला हुडहुडी

मुंबई, ठाण्याला हुडहुडी

मुंबई : मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागांत रात्रीच्या किमान तापमानात मोठी घट झाल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. मुंबईत तर सोमवारी यंदाच्या हिवाळ्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली़ त्यामुळे मोठ्या प्रतीक्षेनंतर मुंबई, ठाण्यातील नागरिकांनी थंडीचा अनुभव घेतला.
प्रामुख्याने मुंबई परिसर आणि उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानाचा पारा घसरल्याने या भागाला हुडहुडी भरली आहे. पुढील दोन दिवसांत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

उत्तरेकडून येणाऱ्या बाष्पामुळे राज्याच्या बहुतांश भागांत दोन दिवसांपर्यंत पावसाळी स्थिती होती. सध्या बहुतांश भागात कोरड्या हवामानाची स्थिती आहे. तुरळक ठिकाणी आकाश अंशत: ढगाळ आहे. सध्या गुजरात आणि मध्य प्रदेशात अनेक भागांत थंडीचा कडाका वाढला आहे. या भागांतून वारे येत असल्याने राज्यातही तापमानाचा पारा घसरला आहे. सोमवारी नाशिक येथे राज्यातील नीचांकी ७.३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. जळगावात ९ अंश किमान तापमान नोंदविले गेले.

मुंबई आणि परिसरासह सर्व कोकण विभागातही तापमानात मोठी घट झाली आहे. दिवसाचे आणि रात्रीचे तापमान सरासरीखाली येऊन चांगलाच गारवा अवतरला आहे. मध्य महाराष्ट्रात पुण्यासह, सांगली, सातारा, सोलापूर, नगर आदी भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळ येऊन रात्रीचा गारवा वाढला आहे. मरावाड्यातही तापमानात घट झाली आहे. ११ ते १५ या कालावधीत उत्तरेकडील काही राज्यांत थंडीच्या लाटेची शक्यता आहे. त्यामुळे या कालावधीत राज्यातील तापमान आणखी कमी होण्याची शक्यता आहे. विशेषत: उत्तर महाराष्ट्रात दोन ते तीन दिवसांत किमान तापमानात २ ते ४ अंशांनी घट होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -