Friday, April 19, 2024
Homeताज्या घडामोडीज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत यांचं निधन

मुंबई : मराठीसिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी निधन झाले. माहिम येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ८९ वर्षांच्या होत्या.

रेखा कामत आणि चित्रा नवाथे या सख्ख्या बहिणी.. कलेची, नृत्याची आवड त्यांना मराठीसृष्टीपर्यंत घेऊन आली.  ‘कुबेराचे धन’, ‘गृहदेवता’, ‘मी तुळस तुझ्या अंगणी’, ‘गंगेत घोडे न्हाले’, ‘अग्गंबाई अरेच्चा’, ‘गृहदेवता’,’बायको माहेरी जाते’यासारख्या अनेक गाजलेल्या सिनेमात त्यांनी चोखंदळ अभिनय केला. तसंच अलिकडच्या काळात रेखा कामत यांनी वास्तुपुरुष, अग्गंबाई अरेच्चा या सिनेमांतही काम केले होते.

मराठी सिनेमांसह अनेक मराठी नाटकातूनही रेखा कामत यांनी आपल्या अभिनयाची जादू दाखवली.  व्यावसायिक रंगभूमीवरही रेखा कामत यांनी अविरत कार्य केलं होतं. ‘एकच प्याला’, ‘संशयकल्लोळ’, ‘भावबंधन’ यांसारख्या संगीत नाटकांमधून तसेच ‘तुझं आहे तुजपाशी’, ‘लग्नाची बेडी’, ‘प्रेमाच्या गावे जावे’, ‘दिल्या घरी तू सुखी राहा’, ‘सुंदर मी होणार’, ‘कल्पवृक्ष कन्येसाठी’, ‘दिवा जळू देत सारी रात’ यांसारख्या व्यावसायिक नाटकांतून त्यांनी भूमिका केल्या. त्याचप्रमाणे रेखा कामत यांनी मोहन वाघ यांच्या चंद्रलेखामधून ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क,’, ‘ऋणानुबंध’,’गोष्टी जन्मांतरीच्या’या नाटकांमध्येही काम केले होते.

मराठी सिनेमा आणि रंगभूमीनंतर त्यांना छोटा पडदाही खुणावू लागला होता.  प्रपंच, माणूस, याला जीवन ऐसे नाव, सांजसावल्या, एका लग्नाची दुसरी गोष्ट या सारख्या अनेक मालिकांमधून  त्यांनी साकारलेली प्रेमळ आजी रसिकांना कमालीची भावली होती.

रेखा कामत यांना अनेक पुरस्कार मिळाले. २००५ सालचा जनकवी पी. सावळाराम पुरस्कार, २००७ मध्ये महाराष्ट्र सरकारचा जीवन गौरव पुरस्कार तर दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचा २०१२ मध्ये नवरत्न पुरस्काराने त्यांनी सन्मानित करण्यात आले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -