Tuesday, April 23, 2024
Homeमहाराष्ट्रपालघरवसई खाडीतील मिठागरे धोक्यात!

वसई खाडीतील मिठागरे धोक्यात!

मिठागर व्यवसायिक धास्तावले, मीठाला रासायिनक दर्प

विरार(प्रतिनिधी) : औद्योगिक वसाहतीतील प्रक्रिया न करता सोडण्यात येणारे रासायनिक पाणी वसईतील खाडीला बाधक ठरत आहे. येथील भागातील मासेमारी वर वाईट परिणाम होत आहे. तर अनेक भागात सदरची मासेमारी बंद झाली असतानाच मीठ उत्पादन करणारी मिठागरे आता दूषित होऊ लागल्याने भागातील अनेक मिठागरे आता बंद होण्याच्या स्थितीत आहेत. मीठ प्रदूषित होत असल्याने ते खाण्या योग्य आहे का? तपासण्यासाठी स्थानिक पातळीवर तपासणारी यंत्रणा नाही. त्यामुळे रंग गंधावरून मीठ प्रदूषित झाल्याचे मिठागरातील कामगारांकडून सांगण्यात येत आहे.

वसई परिसरात एकूण १ हजार ६२६ एकर खार जमीन आहे. त्यातील बहुतांश खार जमिनीवरील मीठ उत्पादकांनी समस्येमुळे हा व्यवसाय बंद केला आहे. यात शहा पुरी ६५ एकर, माणिक २०६ एकर, अब्दुल गफूर ३२९ एकर, देऊळ २६ एकर, शेख इस्माईल १०४ एकर, बंदर वाडी ४७ एकर, खुरस ३० एकर, गणपती ४५ एकर, नवामुख ६० एकर, बहिराम ५७ एकर, सर्वे क्रमांक ई ९२ एकर, फत्ते इस्लाम १३० एकर, माणिक महल ४३६ एकर यातील बहुतांश जमीन कारखान्यातील रासायनिक पाण्यामुळे बाधित झाली आहे. पापडी, वसई पूर्व, सातिवली, गोखीवरे, वालीव, नालासोपारा येथील काही भागातील कारखाने आजही रास्यानिक पाण्यावर प्रक्रिया न करताच खाडी भागात सोडून देतात. अतिशय घातक असलेल्या या रासयनिक पदार्थामुळे या आधीच येथील मासेमारी संपुष्टात आली आहे. आता जेवणातील आवश्यक असलेले मीठ ही बाधित झाल्याने हा गंभीर विषय बनला आहे.

जमिनीमध्ये आयोडीनचे प्रमाण जेथे कमी असेल त्या भौगोलिक प्रदेशात आयोडीनच्या कमतरतेमुळे लोकांना मोठ्या प्रमाणात अनेक व्याधीला बळी पडावे लागते. त्यामुळे आयोडीनचा अभाव टाळण्यासाठी आयोडीनचा पुरवठा करणे आवश्यक ठरते. आयोडीनचा पुरवठा करण्यासाठी मीठ वा खाद्य तेल यांचा वापर करता येतो. त्यामुळे १ किलो मिठात १५ ते ३० मी. ग्रॅ. या प्रमाणात आयोडीन मिसळणे योग्य ठरते. मिठात आयोडीन टाकण्यासाठी चार असेंद्रिय पदार्थाचा वापर केला जातो. यात पोटॅशिअम आयोडेट, पोटॅशिअम आयोडाइट, सोडिअम आयोडेट व सोडिअम आयोडाइड यांचा समावेश होतो. आयोडीनच्या कमतरतेमुळे गर्भातील अर्भके व लहान मुलांच्या वाढीवर, बुद्धिमत्तेवर याचा विपरीत परिणाम होतो व ती मतिमंद वा मुकबधिर होतात.

मोठ्या माणसांत लठ्ठपणा येतो. हालचाली मंदावतात, बौद्धिक क्षमता कमी होते. वाढ खुंटते. स्रियांमध्ये गर्भपाताचे प्रमाण वाढते. वसईत अशा पद्धतीने मिठाचा दर्जा अथवा प्रदूषित मीठ याची माहिती देणारी यंत्रणा नाही. त्यामुळे येथून उपलब्ध खार जमिनीतून मिळणारे मीठ योग्य कि अयोग्य याची माहिती नाही. केवळ रासायनिक दर्प आल्यास अशी मिठागरे योग्य नसल्याचे सांगून येथील उत्पादन थांबवले जाते. भविष्यात आवश्यक असलेले मीठ आरोग्यास हानिकारक ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -