Friday, March 29, 2024
Homeताज्या घडामोडीवसई-विरारचे पोलीस झाले हायटेक!

वसई-विरारचे पोलीस झाले हायटेक!

कर्मचाऱ्यांच्या नोंदी ठेवण्यासाठी क्यू आर यंत्रणेचा वापर

वसई (वार्ताहर) : पोलीस यंत्रणेला भष्ट्राचार मुक्त करण्याबरोबर कर्तव्यदक्ष करण्यासाठी वसई -विरार पोलीस प्रशासनाने आता हायटेक प्रणालीचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. आपला पोलीस कर्मचारी ऑन ड्युटी असताना नेमून दिलेले कार्य करतो की नाही हे पाहण्यासाठी क्यू आर यंत्रणा वसई विरार शहरातील पोलीस ठाण्यात लागू करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील गस्तीवरील पोलीस कुठे गस्त घालतात? ते नेमून दिलेल्या जागेवर गस्त घालतात की नाही? याची अचूक नोंद आता ठेवता येणार आहे. यामुळे शहरातील गस्तीवरील पोलीस नेमक्या कुठल्या ठिकाणी आहे. त्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळून नागरिकांना संकटकाळी तात्काळ मदत मिळणे शक्य होणार आहे.

शहरात कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरात पोलीस गस्त घालण्यात येते. ही गस्त घालण्याचे काम बीट मार्शल करत असतात. बीट मार्शलना कुठे गस्त घालायची तो परिसर नियुक्त केलेला असतो. त्या परिसरातील महत्त्वाची आणि संवेदनशील ठिकाणांवर ते गस्त घालत असतात, परंतु ते नेमकी कशी गस्त घालतात? त्या ठिकाणी पोहोचतात का? याची निश्चित माहिती वरिष्ठांना नसते. शहरातील पोलीस गस्त अधिक परिपूर्ण व्हावी, नागरिकांना भयमुक्त वातावरण मिळावे यासाठी मीरा -भाईंदर वसई -विरार पोलीस आयुक्तालयाने विशेष सॉफ्टवेअर विकसित केले आहे. नागपूर आणि कर्नाटक राज्याच्या धर्तीवर हे सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. यामध्ये गस्तीवरील पोलिसांच्या मोबाइलमध्ये हे क्यूआर कोड सॉफ्टवेअर असणार आहे.

शहरात कुठल्या भागात कुठला पोलीस आहे याची माहिती या क्यूआर कोड संगणक प्रणालीमुळे पोलीस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षात मिळत राहणार आहे. नागरिकांनी संकटकाळी मदतीसाठी ११२ क्रमांकावर कॉल केल्यास त्या भागातील बीट मार्शलला संबंधित ठिकाणी तात्काळ पाठवता येणार आहे. याशिवाय आपल्या परिसरात कोणता पोलीस गस्तीवर आहे, याची माहिती परिसरातील नागरिकांना एसएमएसद्वारे मिळत जाणार आहे. अगदी पोलिसाचे नाव, मोबाइल क्रमांक आदींची माहिती नागरिकांना मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांनादेखील या पोलिसांना संपर्क करणे सोपे होणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर विरार, तुळींज आणि माणिकपूर या पोलीस ठाण्यात ही यंत्रणा राबविण्यात आल्यानंतर ती वसई आणि विरार शहरातील सर्व दहा पोलीस ठाण्यात सुरू करण्यात आली आहे. लवकरच ती मीरा -भाईंदर शहरातील पोलीस ठाण्यात सुरू केली जाणार आहे.

प्रत्येक पोलीस ठाण्याच्या गस्तीवरील पोलिसांना (बीट मार्शल) दैनंदिन गस्त घालण्याची ठिकाणे (पॉइंट) नेमून दिलेले असतात. ज्यात गर्दीची ठिकाणी, बँका, शाळा महाविद्यालय परिसर, निर्जन स्थळे, धार्मिक स्थळे, प्रमुख नाके आदींचा समावेश असतो. बीट मार्शल या ठिकाणी गेल्यावर त्यांना आपल्या मोबाइलमधून क्यू आर कोड स्कॅन करावा लागतो. तो स्कॅन झाला की नियंत्रण कक्षात संबंधित ठिकाणी (पॉइंटवर) कोण पोलीस आहे याची माहिती मिळते. कुठल्या भागात कुठला पोलीस गस्तीवर आहे त्याची माहिती वरिष्ठांना मिळते. संबंधित पोलिसांनी सर्व ठिकाणी गस्त घातली का, कुठल्या मार्गाने गस्त घातली याची संपूर्ण माहिती मिळत जाणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -