Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेनवी मुंबईतील विविध भुयारी मार्ग खडतर!

नवी मुंबईतील विविध भुयारी मार्ग खडतर!

नेरूळ येथील भुयारी मार्गाचे झाले डबके

नवी मुंबई (प्रतिनिधी) : नवी मुंबईतील भूमिगत भुयारी मार्गांची अवस्था खडतर असून, नेरूळ येथील एलपी या महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या भूमिगत भुयारी मार्गाचे पाणी साचून डबके झाले आहे. यामुळे रोगराईला आमंत्रण मिळत आहे.

महानगरपालिका क्षेत्रात विविध प्राधिकरणांनी रेल्वेस्थानक परिसर व महामार्गाखाली भूमिगत रस्त्यांची निर्मिती केली. पण, या भूमिगत पुलांची पावसाळ्यात वाताहत होत असल्याने वाहन चालकांबरोबरच पादचाऱ्यांना याचा फार मोठा त्रास होत आहे.

नवी मुंबई परिसरातील रस्ते, महामार्ग व रेल्वे स्थानकाच्या शेजारून दळणवळणासाठी मनपा, सार्वजनिक बांधकाम, एमएमआरडीए विभागाने भूमिगत भुयारी रस्ते तयार केले; परंतु पावसाळा सुरू झाला की, निचरा होत असलेल्या पाण्याला बाहेर पडण्यास मार्ग नसल्याने वाहनचालकांना कमालीचा त्रास होत आहे. तसेच पादचाऱ्यांनासुद्धा येथून चालताना कमालीचा त्रास होत आहे.

रबाळे, ऐरोली, कोपरखैरणे रेल्वे स्थानकाशेजारी असणाऱ्या भूमिगत भुयारी मार्गात याचा अनुभव नियमित नागरिक घेत आहेत. तर ठाणे, बेलापूर महामार्गावर महापे उड्डाणपुलाशेजारी एमएमआरडीएने बांधलेल्या भुयारी मार्गाची अवस्था देखील अशीच आहे. येथेही पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह चांगलाच होत असतो. यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत आहे.

भुयारांमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात साठल्याने मच्छरांच्या पैदाशीला आमंत्रण मिळत आहे. यामुळे रोगराईला आमंत्रण मिळत आहे. भुयारी मार्गात पाणी असल्याने साहजिकच नागरिकांना रस्ता ओलांडावा लागत आहे. यामुळे आपघाताच्या घटना वारंवार होत आहेत. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कोट्यवधी रुपये पाण्यात गेले आहेत.

मनपाचे दुर्लक्ष….

नवी मुंबईकरांच्या आरोग्याची जबाबदारी मनपा प्रशासनाची आहे. भुयारी मार्गात पाणी साचल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, म्हणून मनपाकडून संबंधित विभागाला कळवून कार्यवाही करण्यास भाग पडण्याची गरज आहे.

नेरूळ येथील भुयारी मार्गात पाणी साठले आहे. मच्छरांची पैदास होऊ नये, म्हणून फवारणी करत असतो. तसेच तिथे अस्वच्छता होणार नाही. याची काळजी घेत असतो. भुयारी मार्गाविषयी पुढील निर्णय घेण्यासाठी सा. बा. विभागाला कळविले जाईल. – राजेंद्र इंगळे, स्वच्छता अधिकारी, नेरूळ

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -