Tuesday, April 16, 2024
Homeअध्यात्मत्याचे दृष्टी ईश्वर दडला...

त्याचे दृष्टी ईश्वर दडला…

स्नेहा सुतार (गोवा)

भगवंत दाता | स्वामी तो आठवा आता || धृ || परामानंद प्रकाशवंत | ज्याला नाही आदी अंत | जो का ध्यानी अखंड संत | धरूनी जाती निर्गुण पंथ || आंतरिक्ष हे लावुनिया लय दक्ष होऊनी मोक्षसुखाला सहजसमाधी राहाता ||१|| जेथूनी झाली सकळ ही सृष्टी | याचा कर्ता न दिसें दृष्टी | म्हणवूनी होते मन हे कष्टी | ऐकुनी अवघ्या ग्रंथी गोष्टी | स्थावरजंगम नाना लीला विचित्र वर्णी | शोभत धरणी तापत तरणी अगम्य करणी चरित्र हे पाहता ||२|| ह्मणे सोहिरा अंगी जडला | आधीच आहे नाही घडला | प्राणी हा संदेही पडला | उपाधीत सापडला | त्याचे दृष्टी ईश्वर दडला | ऐसा वेदांती निवडीला | तो हा व्यापक आत्मा अंतरसाक्षी परिपूर्ण सनातन गोड दिसे गातां ||३||

ईश्वराचे रूप प्रत्येकाने आपापल्या परिने चितारलेले आहे. ज्याचे त्याचे रूपवर्णन अगम्य असेच. भगवंताला आठवावे ते त्याचे आनंद देणारे परम रूप. जे प्रकाशवंत आहे. ज्याच्या दर्शनाने सगळी किल्मिशे दूर होतात. ज्याला ना सुरुवात आहे, ना अंत आहे. जे रूप ध्यनी धरून संतमंडळी ध्यानस्थ होतात. ज्याच्या नामस्मरणे निर्गुण पंथाकडे आपोआपच पावले वळतात. त्याच्या नामातच एवढी किमया आहे की, या ठिकाणी एकरूप होता, मोक्षप्राप्तीचा मार्ग खुला होतो.

ईश्वर म्हणजे ते स्थान आहे, जिथे सृष्टीची निर्मिती झाली आहे. पण हो, तो कर्ता-करविता मात्र आपल्याला सहजासहजी दर्शन देत नाही. त्याला अनुभवावे ते ग्रंथातून, पुराणातून. त्या ईश्वराची नानाविध अगम्य रूपं, वेगवेगळ्या रूपातील त्याच्या वेगवेगळ्या लीला, ज्याने प्रत्येकाच्या मनात त्याच्याविषयी प्रेम निर्माण होते, कुतूहल निर्माण होते, असे ते त्याचे मोहक रूप. सरते शेवटी सोहिरोबानाथ स्वतःकडे कुतूहलाने पाहतात. हे ईश्वरचिंतन तर त्यांच्या मनी कायम दिवस-रात्र चालू असते. त्यांची ओळखही त्या ईश्वरापासूनच होते. ईश्वरमय अशा देहाची दृष्टीही ईश्वरमय झालेली असल्याने त्यांच्या दृष्टीतही ईश्वर दडला आहे. अशा वेदांताच्या पारायणाने त्याचे व त्या ईश्वराचे नाते अगदी दृढ होऊन त्या ईश्वराचे नामचिंतन करतानाचे त्यांचे स्वतःचे रूप सुंदर भासते.

sonchafisneha@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -