Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणवाकण-पाली-खोपोली महामार्ग बनला मृत्यूचा सापळा

वाकण-पाली-खोपोली महामार्ग बनला मृत्यूचा सापळा

१९८ कोटींचा निधी उपलब्ध होऊनही मार्गाची अवकळा

गौसखान पठाण

सुधागड-पाली : वाकड-पाली-खोपोली राज्य महामार्ग क्रमांक ५४८ (अ) च्या रुंदीकरणाचे काम अनेक महिन्यांपासून संथगतीने सुरू आहे. सद्य स्थितीत या मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. पावसाळा आला की मार्गावर मोठ्या प्रमाणात चिखल व राडारोडा जमा होतो. नंतर ऊन पडले की धुरळा उडतो, अशी दुहेरी समस्या येथे सतावत आहे. प्रवासादरम्यान मान, मणका, कमरेची हाडे सर्वकाही खिळखिळे होतात. तर वाहनेही बिघडून वाहनधारकांना न परवडणारा खर्च सोसावा लागत आहे. पाली ते रासळ हा तीन किमीचा मार्गाची सध्या खूप दुरवस्था झाली आहे.

मार्गावरील मोठ्या खड्ड्यात वाहने आदळून अपघात होण्याचा धोका आहे. या राज्य मार्गाचे काम गेल्या पाच वर्षांपासून सुरू आहे. मात्र अजूनही ते पूर्ण झालेले नाही. लॉकडाऊन पासून हे काम संथ गतीने सुरू आहे. अपूर्ण व अर्धवट असलेले काम, काही ठिकाणी खराब झालेला मार्ग यामुळे प्रवासी, वाहन चालक, नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असून संताप व्यक्त केला जात आहे. जवळपास १९८ कोटी रु. खर्च करून राज्य मार्गाच्या रुंदीकरणाचे काम होत आहे. या राज्य मार्गाचे काम पूर्वी मोनिका कन्ट्रक्शनकडे होते. मात्र त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे निदर्शनास आल्याने एमएसआरडीसीने बीसीसी कन्ट्रक्शनकडे दिले होते.

तरीही सुरू असलेले काम, रस्त्यावरील खड्डे, निकृष्ट दर्जाचे काम यामुळे हे काम वरह इन्फ्रा लिमिटेड कंपनीकडे सोपविण्यात आले होते. मात्र अजूनही कामाला पाहिजे तेवढा वेग आलेला नाही. वाकण-पाली-खोपोली महामार्गाचे आजही संथ गतीने काम सुरू आहे वाहनचालक, प्रवासी यांची आजही प्रवासादरम्यान प्रचंड गैरसोय होत असून एमएसआरडीसी यांच्या कारभाराबाबत नागरीकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

वाकण-पाली-खोपोली महामार्गाच्या संथ व अर्धवट कामामुळे तसेच योग्य नियोजनाचा अभाव यामुळे या मार्गाची ठिकठिकाणी दुरवस्था झाली आहे. या मार्गावरून प्रवास करणे अत्यंत त्रासदायक होत आहे. लवकरात लवकर हा मार्ग सुस्थितीत करावा. अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष एमएसआरडीसीच्या विरोधात जन आंदोलन उभे करेल, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे , रायगड जिल्हा सरचिटणीस,ॲड. काशिनाथ ठाकूर यांनी दिला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -