Thursday, April 25, 2024
Homeदेशतिसरी लाट अटळ! वॉर रुम्स पुन्हा सुरु करा, निर्बंध लावा

तिसरी लाट अटळ! वॉर रुम्स पुन्हा सुरु करा, निर्बंध लावा

केंद्राचा राज्यांना आदेश

नवी दिल्ली : ओमायक्रॉनचा डेल्टापेक्षा तीनपट वेगाने फैलाव होत असल्याने ओमायक्रॉनने पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणांना खडबडून जागे केले आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून धडा घेतलेल्या केंद्र सरकारने सर्व राज्यांना महत्वाच्या सूचना केल्या आहेत. यात गरज लागली तर नाईट कर्फ्यू लावा, असा आदेशच केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिला आहे. डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉन तीन पट संसर्गजन्य असून त्याला रोखण्यासाठी वॉर रुमची गरज असल्याचेही केंद्राने राज्यांना सांगितले आहे. केंद्राने राज्यांना काही सूचना केल्या असून यामध्ये मोठ्या प्रमाणात चाचणी, नाईट कर्फ्यू आणि गर्दीवर नियंत्रण अशा मुद्द्यांचा उल्लेख आहे.

आरोग्य मंत्रालयाने राज्यांना पत्र पाठवले असून स्थानिक परिस्थितीनुसार काळजी घ्यावी असे सांगितले आहे. ओमायक्रॉनसोबतच देशातील अनेक भागांमध्ये अद्यापही डेल्टा उपस्थित आहे, असे यावेळी केंद्राने अधोरेखित केले आहे. तसेच गरज लागल्यास मार्गदर्शक तत्वे जाहीर करावी, असेही म्हटले आहे. गेल्या आठवड्यातील पॉझिटिव्हीटी रेट १० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास किंवा ऑक्सिजन तसेच आयसीयू बेडसाठी ४० टक्के व्याप्ती असेल तर ही मार्गदर्शक तत्वे जाहीर केली जाऊ शकतात, असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.

केंद्राने यावेळी दारोदारी जाऊन रुग्णांचा शोध घेणे आणि कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील सर्वांची माहिती घेण्यासंबंधी सुचवले आहे. जिनोम सिक्वेन्सिंगसाठी क्लस्टर इन्फेक्शनचे नमुने ताबडतोब INSACOG लॅबमध्ये पाठवले पाहिजेत असंही सांगण्यात आले आहे.

१०० टक्के लसीकरण होईल यासाठी राज्यांनी जास्त प्रयत्न करावेत असे यावेळी सुचवण्यात आले आहे. तसेच हॉस्पिटल बेड्स, रुग्णवाहिका, ऑक्सिजन सामग्री, औषधे अशा आरोग्यासंबंधी पायासुविधांसाठी आपत्कालीन निधीचा वापर करण्यासंबंधीही सुचवण्यात आले आहे.

दरम्यान, देशात ओमायक्रॉनमुळे कोरोनाची तिसरी लाट येईल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. डेल्टा व्हेरिएंटची जागा ओमायक्रॉनने घेतल्यास दररोज १४ लाख नवे रुग्ण आढळू शकतात अशी भीती भारताचे कोविड टास्क फोर्स प्रमुख डॉ. व्ही. के. पॉल यांनी व्यक्त केलेली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला ओमायक्रॉनचा फैलाव वाढू शकतो आणि फेब्रुवारी महिन्यात रुग्णसंख्येचा उद्रेक होऊ शकतो, अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे. तसे झाल्यास पुन्हा लॉकडाऊनसारखे कठोर निर्बंध लावले जाणार का, असा प्रश्न विचारला जात असून केंद्रीय आरोग्य सचिवांनी आज राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना जे पत्र लिहिले आहे त्यातून काही महत्त्वाचे संकेत मिळाले आहेत.

देशातील १४ राज्यांमध्ये ओमायक्रॉनचा फैलाव झाला आहे. एकूण रुग्णसंख्या २२० वर पोहचली असून त्यात सर्वाधिक ६५ रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. त्यानंतर दिल्लीत ५४ तर तेलंगणमध्ये २४ रुग्ण आढळले आहेत. यानंतर कर्नाटक (१९), राजस्थान (१८), केरळ (१५) आणि गुजरात (१४) यांचा समावेश आहे. यामधील ७७ रुग्ण उपचारानंतर बरे किंवा स्थलांतरित झाले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -