मुंबई : दांडक्यांचे फटके, उठाबशा, सुर्यनमस्कार, बेडूक उड्या, गुन्हा दाखल करणे, दंड वसूल करणे, लेखी माफी लिहून घेणे, हातात बोर्ड पकडून फोटो काढणे असे एकाहून अनेक उपाय करुनही लॉकडाउनच्या काळामध्ये रस्त्यांवर कारण नसताना भटकणा-यांवर काही परिणाम झालेला नाही. त्यामुळेच आता पोलिसांनी अशा भटक्या लोकांवर करावाई करण्याची एक मजेदार आणि हटके पद्धत शोधून काढली आहे. नियम मोडणा-यांना अशीच अद्दल घडवी पाहिजे, असे हा व्हिडिओ पाहिल्यावर नेटक-यांनी म्हटले आहे.

तामिळनाडू पोलिसांच्या या पद्धतीचे सोशल नेटवर्किंगवर कौतुक होताना दिसत आहे. कारण नसताना रस्त्यावर भटकणा-यांना कोरोनाची भिती काय असते याची प्रचिती यावी म्हणून पोलिसांनी थेट अशा भटक्या व्यक्तींना कोरोनाचा खोटा रुग्ण असणा-या रुग्णवाहिकेमध्ये कोंडले.

नाकाबंदी असणा-या रस्त्यावरुन ट्रीपल सीट भटकणा-या तिघा मित्रांची दुचाकी पोलीस थांबवतात असे या व्हिडिओच्या सुरुवातीला दिसते. त्यानंतर पोलीस त्यांना समजवताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये पुढे पोलीस या तिघांना एका रुग्णवाहिकेमध्ये जाण्यास सांगतात. हे तरुण रुग्णवाहिकेचे दार उघडतात तेव्हा आतमध्ये मास्क लावलेला निळ्या रंगाचे रुग्णाचे कपडे घातलेला व्यक्ती दिसतो. हा कोरोनाचा रुग्ण असून त्याच्याबरोबर तुम्हाला ठेवण्यात येईल असे सांगितल्यावर तरुण पळून जाण्याचा प्रयत्न करतात. हे तरुण स्वत:हून या रुग्णवाहिकेत जाण्यास नकार देतात, मात्र या तरुणांना धडा शिकवण्यासाठी पोलीस त्यांना उचलून उचलून या रुग्णवाहिकेमध्ये कोंबतात. त्यावेळी या तरुणांची जी काही भंभेरी उडते ती पहाण्यासारखीच आहे. हा व्हिडिओ मागील काही दिवसांपासून सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.