सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील देवगड तालुक्याच्या कातवण येथील आंबा (Hapus Mango) बागायतदार दिनेश दीपक शिंदे व प्रशांत सीताराम शिंदे या दोन युवा आंबा बागायतदारांनी आपल्या बागेतील हापूसचे नैसर्गिक पद्धतीने पीक घेतले आहे.

त्यांनी देवदिवाळी व मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारचा मुहूर्त साधून आंबा काढण्याचा शुभारंभ केला. यावेळी पहिली दोन डझन आब्यांची पेटी मुंबई वाशी मार्केट येथील सुप्रसिद्ध व्यापारी अशोक हांडे यांच्या पेढीवर पाठविण्यात आली आहे.

कातवण येथील आंबा बागायतदार प्रशांत शिंदे व दिनेश शिंदे यांच्या गोरक्ष गणपती मंदिर या ठिकाणी असलेल्या घरानजीकच्या बागेत असलेल्या हापूसच्या कलमांना १५ ऑगस्टपासूनच मोहर येण्यास सुरुवात झाली होती. मात्र, काही कलमांवरील मोहर ऊन – पावसाच्या खेळात गळून पडला. तर चार ते पाच कलमांवरील मोहर तसाच टिकून राहिला. तो टिकवण्यासाठी या शिंदे बंधूंनी खूप मेहनत घेतली. त्यामुळेच या चार कलमांवर मिळालेल्या आंब्यांचे पहिले फळ काढत देवगड हापूसची पहिली पेटी मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी शुभमुहूर्त केला आहे. या पेटीची विधिवत पूजा करून ही पेटी वाशी येथे जाण्यासाठी रवाना झाली. स्वतः आंबा बागायतदार शिंदे हे सदर आंबापेटी घेऊन वाशी मार्केटला रवाना झाले आहेत.

या दोन डझनच्या आंबा पेटीला साधारणतः सात ते आठ हजार रुपयांच्या आसपास भाव मिळेल असा अंदाज शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. मात्र यावर्षी आंबा सीझन पाहता अजूनही हापूसच्या कलमांना पालवीच येत आहे. मात्र अशावेळी हापूसच्या कलमांची योग्य निगा राखत पहिली पेटी या दोन युवा आंबा बागायदारांनी पाठविली आहे. ऋतुचक्रात वारंवार बदल होत असूनही या दोन बंधूंनी मोहोर टिकविण्यासाठी अथक प्रयत्न केले. या वेळी आलेल्या आंबा पिकांची चव देखील स्वतः चाखून पहिली आणि त्यानंतरच उर्वरित आंबे काढत ही पेटी मार्गस्थ केली आहे. नैसर्गिक पद्धतीने आंबा पिकवून त्याची स्वतः चव चाखून आपण पिकविलेल्या मालाचा दर्जा चांगला आहे की नाही हे बागायतदाराने पाहणे खूप गरजेचे असते. या शुभारंभप्रसंगी आंबा बागायतदार दीपकचंद्र शिंदे, दिनेश शिंदे, प्रशांत शिंदे, नरेश डामरी, पप्पू लाड आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here