Thursday, April 18, 2024
HomeUncategorizedसिलिकॉन व्हॅलीत भारतीयांचा दबदबा

सिलिकॉन व्हॅलीत भारतीयांचा दबदबा

प्रा. नंदकुमार गोरे

अलीकडेच एक बातमी सातत्यानं चर्चेत होती. ती म्हणजे पराग अग्रवाल यांची ट्विटरचे सीईओ म्हणून झालेली नियुक्ती. त्यांचा पगारही बराच चर्चेत होता. बरं ही चर्चा फक्त भारतातच नाही, तर जगभर होती. भारतात शिक्षण घेऊन उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या युवकांचं अमेरिकेला विशेष प्राधान्य असतं. भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये असलेली लोकशाही व्यवस्था, हे जसं कारण आहे. तसंच अमेरिकेतल्या विद्यापीठांचा जागतिक दर्जा आणि तिथे शिक्षण घेतल्यानंतर अमेरिकेतच स्थायिक होण्याची ओढ, हेही त्याचं कारण आहे.

पूर्वी आपण अशा विद्यार्थ्यांमुळे होणाऱ्या देशाच्या तोट्याला ‘ब्रेन ड्रेन’ म्हणायचो. आता मात्र तसं म्हणत नाही. आपलेच विद्यार्थी जगातल्या मोठ्या कंपन्यांमध्ये उच्च पदावर जात आहेत, याचा आपल्याला अभिमान वाटायला लागला आहे. पराग अग्रवाल त्यापैकीच एक. त्याचं शिक्षण मुंबईतल्या आयआयटीमध्ये झालेलं. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी जगात सर्वात मोठ्या कंपन्यांमध्ये एक असलेल्या ट्विटरचे ते मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बनले आहेत. मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला, अल्फाबेटचे सुंदर पिचाई यांच्यासह आयबीएम, अॅडोब, पालो ऑल्टो नेटवर्क्स, व्हीएमवेअर आणि वीमियो या सर्वच कंपन्यांचे बॉस आता भारतीय वंशाचे आहेत. भारतीय वंशाच्या तरुणांनी हे कसं शक्य केलं, हा औत्सुक्याचा विषय असला तरी त्यामागे त्यांची विद्वत्ता आणि कठोर परिश्रम हे कारण आहे. अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येत एक टक्का लोकसंख्या भारतीय वंशाच्या लोकांची आहे आणि सिलिकॉन व्हॅलीत भारतीय वंशाच्या लोकांची संख्या सहा टक्के आहे.

सिलिकॉन व्हॅली माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित आहे. ज्या अमेरिकेने काही दशकांपूर्वी भारताला संगणक देण्याचं नाकारलं होतं, त्याच अमेरिकेला भारतानं परम महासंगणक बनवून चोख उत्तर दिलं आणि आता सिलिकॉन व्हॅलीतल्या बहुतांश मोठ्या कंपन्यांच्या सर्वोच्च स्थानी भारतीय अधिक प्रमाणात आहेत. बीपीओमध्ये भारत सर्वात पुढे आहे. त्याचं कारण टाटा, इन्फोसिस, पटनी, विप्रो आदी कंपन्यांनी भारत आणि अमेरिकेतही आपलं जाळं विस्तारलं आहे. अमेरिकेत माहिती तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाच्या हाताळणीसाठी लागणारं शिक्षण भारतात दिलं जातं. एक मोठं सत्य हेही आहे की, भारतीय वैयक्तिक आयुष्यापेक्षा व्यावसायिक जीवनाला अधिक महत्त्व देतात. भारतीयांचा हा स्वभाव ‘अमेरिकन वर्क कल्चर’ला अनुकूल आहे. सिलिकॉन व्हॅलीतले भारतीय वंशाचे सीईओ त्या ४० लाख अल्पसंख्याक गटाचे भाग आहेत, जे अमेरिकेत सर्वात श्रीमंत आणि सुशिक्षित लोकांमध्ये समाविष्ट होतात. यातले दहा लाख लोक शास्त्रज्ञ आणि इंजिनीअर आहेत. ७० टक्के एच-वनबी व्हिसावर अमेरिकेमध्ये काम करत आहेत.

हा तोच व्हिसा आहे, जो अमेरिका भारतीय इंजिनीअर्ससाठी जारी करतं. त्याच वेळी सिएटलसारख्या शहरात काम करणारे ४० टक्के इंजिनीअर भारतीय आहेत, हेही लक्षात घ्यायला हवं. २०१६ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘द अदर वन परसेंट : इंडियन्स इन अमेरिका’ या पुस्तकात हा सर्व १९६०च्या दशकातल्या अमेरिकन इमिग्रेशन धोरणात झालेल्या बदलाचा परिणाम असल्याचं म्हटलं आहे. नागरिक हक्क आंदोलनाच्या वेळी राष्ट्रनिहाय संधींचा कोटा बदलून कौशल्य आणि कौटुंबिक एकीकरणाला प्राधान्य दिलं गेलं. यानंतर उच्चशिक्षित भारतीय – त्यात शास्त्रज्ञ, इंजिनीअर, डॉक्टर आणि नंतर मोठ्या संख्येत सॉफ्टवेअर प्रोग्रामर अमेरिकेत गेले. भारतीय स्थलांतरितांचा हा गट इतर देशांमधल्या स्थलांतरितांपेक्षा वेगळा होता.

या लोकांची निवड तीन स्तरावर करण्यात आली. हे लोक अमेरिकेत मास्टर्स डिग्रीचा खर्च उचलण्यासही सक्षम होते. सिलिकॉन व्हॅलीतल्या बहुतांश सीईओंकडे अमेरिकेतली मास्टर्स डिग्री आहे. त्यानंतर विज्ञान, तंत्रज्ञान आणि इंजिनीअरिंग, स्टेम कोर्स (गणित आणि विज्ञानाचे अधिक कोर्स) या क्षेत्रापर्यंत व्हिसा मर्यादित करण्यात आला, जेणेकरून अमेरिकेच्या ‘लेबर मार्केट’ची मागणी पूर्ण केली जाऊ शकेल. भारतातली ही सर्वोत्तम गुणवत्ता आहे, कारण हे लोक त्या ठिकाणी पोहोचत आहेत, जिथे सर्वोत्तम गुणवत्ता असलेले पोहोचतात किंवा पोहोचू पाहतात. या लोकांनी सिलिकॉन व्हॅलीमध्ये जे नेटवर्क तयार केलं, त्याचा त्यांना फायदा मिळतो. एकमेकांची मदत करणं हा या नेटवर्कचा उद्देश आहे.

भारतात जन्मलेल्या अनेक सीईओंनी सर्वोच्च पदापर्यंत पोहोचण्यासाठी बरीच मेहनत घेतली आहे. या मेहनतीदरम्यान त्यांनी अनेक संस्थापक-सीईओंचा भेदभाव, अहंकारी स्वभावाचा अनुभवसुद्धा घेतला. मात्र, त्यामुळे ते अधिक विनम्र बनले. नडेला आणि पिचाई यांच्यासारख्यांकडे आपल्याला एक ‘सभ्य’ संस्कृती दिसते, जी त्यांना उच्चपदापर्यंत घेऊन जाते. भारतीय वंशाच्या लोकांमधली ‘डाऊन टू अर्थ’ राहण्याची सवय आणि सकारात्मक स्वभाव अमेरिकन उद्योग जगताला भावतो.

अमेरिकेत ग्रीन कार्ड मिळण्यात येणारी अडचण आणि भारतीय बाजारात निर्माण झालेल्या संधी पाहता, परदेशात जाऊन करिअर करण्याची ओढ कमी होत असली तरी, अजूनही अमेरिकेतल्या अनेक उद्योगांमध्ये भारतीयांचं स्थान अतिशय महत्त्वाचं आहे. अर्थात, अमेरिकेत जाऊन नोकरीत स्थिरावण्याचं, तिथेच स्थायिक होण्याचं स्वप्न आता मागं पडलं आहे. त्याऐवजी आता स्टार्ट अप सुरू करण्याचं स्वप्न अनेकांनी बाळगलं आहे. मोठ्या पदावर जाण्याचं स्वप्न आणि त्यासाठी मेहनत घेतली जात आहे. भारतात वाढणाऱ्या युनिकॉर्न कंपन्या पाहता जाणकारांना वाटतं की, या देशात महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान कंपन्या बनत आहेत. मात्र, त्यांच्या जागतिक परिणामांबाबत आताच निष्कर्षाला पोहोचणं घाईचं ठरेल. भारतातली स्टार्ट अप इकोसिस्टीम अजून नवी आहे. एंटरप्रेन्युअरशिप आणि कार्यकारी रँकमध्ये यशस्वी भारतीयांनी रोल मॉडेलचं काम केलं. मात्र हे पुढे नेण्यासाठी आणखी अवधी लागेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -