Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रपालघरपाटलाच्या कोंबड्याची बांग आता बिघडली

पाटलाच्या कोंबड्याची बांग आता बिघडली

रात्री-अपरात्री येऊ लागला आवाज, झोपमोडीच्या तक्रारी वाढल्या

वसंत भोईर

वाडा : तालुक्यात पूर्वी गाव खेड्यात पडवीतील कोंबडा आरवला (बांग) की पहाट झाली, असे समजून संपूर्ण गाव जागे होत. आणि जो-तो आप आपल्या कामाला लागत होता. ग्रामीण भागातील याच अलार्मवर ग्रामस्थांचा शंभर टक्के विश्वास होता. आता गाव खेड्यातील हा अलार्म बिघडल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

वेळीअवेळी कोंबडे आरवत असल्याने शेतामध्ये काम करून थकून भागून झोपी गेलेल्या बळीराजाची झोपमोड होत आहे. नैसर्गिक चक्र बदलल्याचा हा परिणाम आहे की आणखी कोणता हा प्रश्न सध्या खेड्यातील नागरिकांना पडला आहे. विशेष म्हणजे, झोपमोड होत असल्याने नेमकी तक्रार कुठे करायची, असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.

सूर्योदयापूर्वी कोंबडे बांग देतात. हा नैसर्गिक नियम आहे, याच नियमा वरून नागरिकांचाही दिवस सुरू होतो. मात्र तालुक्यातील काही गावांमध्ये कोंबडे रात्री दोन ते तीन वाजेपासून मोठमोठ्याने आरवत असल्याने ग्रामस्थांची झोपमोड होत आहे. एक कोंबडा आरवला की, गावातील इतरही कोंबडे आरवणे सुरू करतात. यामुळे दोन ते तीन वाजेपासून गावात गलबला होत आहे. हे नेमके कशामुळे होतो हा संशोधनाचा विषय आहे. मात्र, नागरिकांची झोप मोड होत असल्याने पूर्वीचा हा आलार्म आता त्रासदायक बनू पाहत आहे.

नैसर्गिक चक्र बदलले काय?

मागील काही वर्षांमध्ये नैसर्गिक चक्र बदलले आहे. त्याचा थेट परिणाम प्रत्येक जीवावर होत आहे. त्यामुळे या कोंबड्यांनी आपला वेळ तर बदविला नसेल ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ग्रामीण अर्थकारण?

तालुक्यातील अनेक नागरिक गावठी कोंबडे पाळतात. या कोंबड्यांना ग्रामीण तसेच शहरामध्ये खूप मागणी आहे. त्यामुळे काही जण कोंबड्यांची विशेष निगा राखण्याचे काम करतात. त्यामुळे यातून काही नागरिकांना बऱ्यापैकी आर्थिक लाभही होतो.

‘गरज सरो, वैद्य मरो’

पूर्वी नागरिक लवकर झोपी जायचे आणि पाहाटी उठायचे, आता वाढत्या तंत्रज्ञानाच्या युगात मानसाची दिनचर्या बदलली आहे. आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला आहे. रात्री उशिरापर्यंत टीव्ही मोबाईल बघण्यात वेळ जात आहे. कोंबड्यांचा आरवण्याचा वेळ बरोबर आहे. माणसानेच आपल्या दिनचर्याची वेळ बदलली आहे. गरज सरो वैद्य मरो, अशी अवस्था माणसाची झाल्याचे एका पक्षी तज्ज्ञाने सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -