Thursday, April 18, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेनवी मुंबईत भूमिगत वाहिन्यांअभावी रस्त्यांची अवस्था गंभीर

नवी मुंबईत भूमिगत वाहिन्यांअभावी रस्त्यांची अवस्था गंभीर

नवी मुंबई (प्रतिनिधी) : नवी मुंबईमधील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आयुक्तांना बहुस्तरीय भूमिगत वाहिन्या टाकाव्यात म्हणून विनंत्या केल्या. पण त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. त्यामुळे आजही सुंदर व स्वच्छ असणारा रस्ता खोदून विविध वाहिन्या टाकल्या जात असल्यामुळे रस्त्यांची अवस्था गंभीर होत आहे. रस्ता खराब होऊन दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा ऱ्हास होत आहे.

शहरातील रस्त्यांची निर्मिती करताना बहुस्तरीय भूमिगत वाहिन्या अत्यावश्यक आहेत. भूमिगत वाहिन्या असतील, तर रस्त्यांचे आयुष्यमान वाढते. नव्याने रस्ता निर्माण करताना किंवा देखभाल व दुरुस्ती करताना रस्त्याच्या व गटाराच्या दरम्यान वाहिन्या टाकल्या जातात. या वाहिन्यांमध्ये आंतरजाल, खासगी, सरकारी मोबाईल वाहिन्या, महावितरणच्या केबल तसेच इतर वाहिन्या टाकल्या जातात. तसेच नवनवीन यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर त्या टाकताना जर बहुस्तरीय भूमिगत वाहिन्या टाकल्या गेल्या असतील, तर रस्त्याचे खोदकाम करण्याची गरज लागत नाही. त्यामुळे रस्त्याचे अस्तित्व धोक्यात येत नाही. परंतु मनपाकडून बहुस्तरीय भूमिगत वाहिन्या टाकल्या जात नसल्याने रस्ते खोदावे लागतात. त्यामुळे रस्त्याचे नुकसान होऊन पुन्हा पुन्हा रस्त्यांचा पुनर्विकास करून कोट्यवधी रुपयांची नासधूस होत आहे.

नवी मुंबईत आजही घणसोलीमधील गणेश नगर ते जिजामाता नगर दरम्यान असणाऱ्या रस्त्यावर महावितरणच्या वाहिन्यांची दुरुस्ती करण्यासाठी रस्ता खोदला गेला आहे. तसेच आग्रोली, बेलापूर येथे काही महिन्यांपूर्वीच रस्त्याचे डांबरीकरण केले होते. आता त्याच ठिकाणी असणाऱ्या रस्त्यावर देखील रस्ते खोदून केबल टाकण्याचे काम जोरात चालू आहे. यामुळे हे रस्ते खराब होत आहेत. तसेच नवी मुंबईतील इतर विभाग कार्यालय क्षेत्रात देखील कामे सुरू आहेत. यामुळे पैशांचा नाहक चुराडा होत असताना दिसत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सुधीर दाणी यांनी सांगितले.

युरोपमध्ये बहुस्तरीय भूमिगत वाहिन्या टाकल्याने रस्त्यांचे आयुर्मान वाढले आहे. तसेच नवी मुंबईतील रस्त्यांचे आयुर्मान वाढण्यासाठी व नाहक खर्च टाळण्यासाठी आयुक्तांच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवले. पण कृती शून्यच दिसून आली. – सुधीर दाणी, सामाजिक कार्यकर्ते, नवी मुंबई

बहुस्तरीय भूमिगत वाहिन्यांबाबत अभियांत्रिकी विभागाला निर्देश देण्यात येतील. – अभिजित बांगर, आयुक्त, मनपा

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -