Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेThackeray-Shinde clash : ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बेदम मारहाण; राजन...

Thackeray-Shinde clash : ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बेदम मारहाण; राजन विचारेंनाही धक्काबुक्की

पोलिसांचा दोन्ही गटावर लाठीमार, दोन्ही गटांकडून परस्पर गुन्हे दाखल

ठाणे : वागळे इस्टेट येथील किसननगर भागात ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद (Thackeray-Shinde clash) झाला.

या वादात (Thackeray-Shinde clash) ठाकरे गटाच्या दोन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बेदम मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेप्रकरणी दोन्ही गटांनी श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या आहेत. त्यामुळे दोन्ही गटांविरोधात परस्पर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मारहाण झाली त्यावेळेस (Thackeray-Shinde clash) घटनास्थळी ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे, शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे पुतणे आणि ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे हे देखील उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची किसननगर ही राजकीय कर्मभूमी आहे. येथील भटवाडी परिसरात ठाकरे गटाकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे, केदार दिघे हे देखील उपस्थित होते. याच दरम्यान शिंदे गटाचे माजी नगरसेवक योगेश जाणकर त्याठिकाणी आले. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. त्यावेळी दोन्ही गटात वाद झाला. या वादात ठाकरे गटाचे दोन पदाधिकारी जखमी झाले. यावेळी राजन विचारेंनाही धक्काबुक्की करण्यात आली. राजन विचारे यांना कडेकोट पोलिस बंदोबस्तात घटनास्थळाहून बाहेर काढण्यात आले. ही मारहाण कॅमेऱ्यांतही कैद झाली आहे. काल मध्यरात्री ही घटना घडली.

त्यानंतर राजन विचारे हे श्रीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाले. तर शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के हे देखील त्याठिकाणी आले. दोन्ही गटाने एकमेकांविरोधात तक्रारी दिल्या. त्यानंतर दोन्ही गटाच्या एकमेकांविरोधात परस्पर गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिस ठाण्याबाहेरही दोन्ही गट समोरासमोर आल्याने पोलिसांनी दोन्ही गटावर लाठीमार केला आणि जमाव पांगवला.

घटनेनंतर ठाकरे गटाकडून समाजमाध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्यात गुंडाराज सुरू आहे का? असा आरोप ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी केला आहे.

मारहाणीच्या घटनेनंतर दोन्ही गटांनी परस्परांवर आरोप केले आहेत. ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी सांगितले की, काल किसननगर येथे ठाकरे गटाचा मेळावा सुरू असतानाच शिंदे गटाचे कार्यकर्त्यांनी एकदम घुसखोरी करत आमच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यासाठी बाहेरील जिल्ह्यातून १०० माणसं आणली होती. ठाकरे गटावर दबाव टाकण्यासाठीच असा प्रयत्न केला जात आहे.

तर, शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी सांगितले की, काल किसननगर येथे एका वाढदिवसाच्या कार्यक्रमातून आमच्या नगरसेवकाला खासदार राजन विचारे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी हाकलून लावले. वाढदिवस सुरू असतानाच आमच्या नगरसेवकाला तु इथे कशाला आलास? असे विचारत त्याला धक्काबुक्की करत बाहेर काढले. त्यामुळे नंतर वाद झाला. याची सुरूवात ठाकरे गटानेच केली, असे म्हस्के यांनी सांगितले.

अन्य बातम्या…

ठाणे जिल्ह्यातूनच ८ कोटींच्या बनावट नोटा जप्त

ठाण्यातील विवियाना मॉल राडाप्रकरणी जितेंद्र आव्हाडांसह १०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

दुर्गाडी येथे होणार नौदल टी-८० युद्धनौकेचे स्मारक

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -