Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रपंढरपूरमधील दगडी पूल पाण्याखाली

पंढरपूरमधील दगडी पूल पाण्याखाली

भीमा नदीकाठाजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

सूर्यकांत आसबे

सोलापूर : नीरा व भीमा नदीच्या खोऱ्यात पडलेला मुसळधार पाऊस आणि उजनी धरण क्षमतेने भरल्याने या प्रकल्पातून सोडण्यात येत असलेले ४० हजार क्युसेक पाणी यामुळे पंढरपूरमधील जुना दगडी पूल पाण्याखाली गेला आहे. दरम्यान, भीमा नदीकाठच्या नागरिकांनी सावधानता बाळगावी. तसेच संभाव्य पूर परिस्थितीमुळे निर्माण होणाऱ्या आपत्तीजनक परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिली.

उजनीचा विसर्ग सायंकाळी चाळीस हजार क्युसेक होता; तर वीरमधून पाणी सोडण्याची प्रक्रिया दुपारी बंद करण्यात आली आहे. भीमा सोलापूर जिल्ह्यात दुथडी भरून वाहत असून नृसिंहपूर येथे ४९ हजार क्युसेकचा विसर्ग मिळत होता. तर पंढरीत नदी तीस हजार क्युसेकहून अधिकने वाहात होती. त्यामुळे जुना दगडी पूल पाण्याखाली गेला आहे.

संभाव्य आपत्तीजनक परिस्थितीचा सामना करण्यासाठी गावनिहाय नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये प्रत्येक गावची लोकसंख्या, शाळा-कॉलेज, मंगल कार्यालय, रुग्णालय, वैद्यकीय अधिकारी तसेच खासगी दवाखाने, आरोग्य केंद्रे, जनावरांचे दवाखाने, सेवाभावी संस्था, पोहणाऱ्या व्यक्ती, औषध दुकाने यांची माहिती संकलित करण्यात आली आहे. धान्य वितरण व गॅस वितरण व्यवस्थेबाबत नियोजन करण्यात आले आहे. वीज वितरण विभागाकडून नदीकाठचे वीज वाहक खांब तसेच रोहित्र सुरक्षित स्थळी लावण्यात आले आहे. औषधसाठा मुबलक उपलब्ध राहिल याची दक्षता घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या असल्याचेही प्रांताधिकारी गुरव यांनी सांगितले.

चंद्रभागा नदी पात्रात येणाऱ्या वारकरी व भाविकांना नगरपालिका प्रशासनाकडून ध्वनीक्षेपकाव्दारे वेळोवेळी सूचना देण्यात येत आहेत. पूरपस्थितीत बोट व्यवस्था, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग, तसेच स्वयंसेवक व स्वयंसेवी संस्थांची पथके तयार करण्यात आली आहेत. अतिवृष्टी व पूरपरिस्थितीवेळी नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या विसर्गाबाबत पाटबंधारे विभागाने आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही प्रांताधिकारी गुरव यांनी सांगितले. आपत्कालीन परिस्थितीमध्ये ग्रामस्थांनी प्रशासनाला सहकार्य करावे, तसेच दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहनही गुरव यांनी केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -