Friday, March 29, 2024
Homeदेशआठ वर्षांत स्थिरता, समन्वयावर दिला भर

आठ वर्षांत स्थिरता, समन्वयावर दिला भर

लखनऊ येथे गुंतवणूकदार शिखर परिषदेत मोदींचे प्रतिपादन

८०,००० कोटींच्या १४०६ प्रकल्पांची पायाभरणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या ८ वर्षांत स्थिरता, समन्वय, व्यवसाय सुलभ करण्यावर भर दिला असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. लखनऊ येथे गुंतवणूकदार शिखर परिषदेत ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी लखनऊ येथे उत्तर प्रदेशमधल्या गुंतवणूकदारांच्या शिखर परिषदेच्या भूमिपूजन समारंभाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी ८०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या १४०६ प्रकल्पांची पायाभरणी केली. या प्रकल्पांमध्ये कृषी आणि संबंधित, आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स, सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग, उत्पादन, अक्षय ऊर्जा, औषध, पर्यटन, संरक्षण आणि एरोस्पेस, हातमाग आणि वस्त्रोद्योग इत्यादी विविध क्षेत्रांचा समावेश आहे. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह देशातील प्रमुख उद्योगपती उपस्थित होते.

उत्तर प्रदेशातील तरुणांची क्षमता, समर्पण, कठोर परिश्रम आणि समज यावर विश्वास दाखवल्याबद्दल पंतप्रधानांनी गुंतवणूकदारांचे आभार मानले. तसेच पंतप्रधानांनी उद्योगपतींना काशीला जाण्यास सांगितले. यावेळी त्यांनी काशीचा प्रतिनिधी म्हणून मी तुम्हाला काशीला भेट देण्याची विनंती करतो, प्राचीन वैभवासह काशीचा नवीन आवृत्तीत कायापालट होऊ शकतो. उत्तर प्रदेशच्या क्षमतेचे हे जिवंत उदाहरण आहे, असे ते म्हणाले.

आज दाखल करण्यात आलेले प्रस्ताव उत्तर प्रदेशमध्ये नवीन संधी निर्माण करतील आणि हे तिथल्या विकास गाथेवरच्या आत्मविश्वास वाढीचे द्योतक आहे, असेही पंतप्रधान म्हणाले. जगाला हव्या असलेल्या विश्वासार्ह भागीदाराच्या मापदंडांची पूर्तता करण्याची ताकद फक्त आपल्या लोकशाहीवादी भारताकडे आहे. आज जग भारताच्या क्षमतेकडे पाहून भारताच्या कामगिरीचे कौतुक करत आहे, असे ते म्हणाले. ज्या २० अर्थव्यवस्थांमध्ये भारत सर्वात वेगाने प्रगती करणारा देश आहे आणि जागतिक रिटेल इंडेक्समध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. भारत हा जगातील तिसरा सर्वांत मोठा ऊर्जा ग्राहक देश आहे.

गेल्या वर्षी जगातील १०० हून अधिक देशांमधून ८४ अब्ज डॉलरची एफडीआय अर्थात परदेशी थेट गुंतवणक आली. भारताने गेल्या आर्थिक वर्षात ४१७ अब्ज डॉलर म्हणजेच ३० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मालाची निर्यात करून नवा विक्रम निर्माण केला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. मोदी यांच्या दौऱ्याआधी शुक्रवारी दुपारी नमाजानंतर कानपूरमध्ये दोन समाजात तुफान दगडफेक करण्यात आली. दगडफेकीत ७ जखमी झाले. यावेळी पेट्रोल बॉम्ब आणि गोळीबारही करण्यात आला. ही परिस्थिती पोलिसांकडून नियंत्रणात आणण्यात आली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -