Saturday, April 20, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखगती आणि शक्ती, रोजगाराची संधी

गती आणि शक्ती, रोजगाराची संधी

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करीत आहोत. देश स्वतंत्र होऊन ७५ वर्षे झाली असून या काळात देशाने वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती केली असली तरी म्हणावा तितका विकास अद्याप झालेला नाही, हे मात्र निश्चित. त्याचप्रमाणे अनेक क्षेत्रांकडे योग्य लक्ष पुरविल्यास देशाची चौफर प्रगती होऊ शकते आणि देश जगाचे नेतृत्व करण्यास सज्ज होऊ शकतो, ही बाब विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चाणाक्ष बुद्धीने हेरली आणि तत्काळ त्या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात केली. देशाला कोणत्या दिशेने आणि कशा प्रकारे पुढे घेऊन जायचे याची पुरेपूर जाण असलेल्या मोदी यांनी पंतप्रधानपदाच्या आपल्या दुसऱ्या कार्यकाळात वेगवान भारत घडविण्याच्या दिशेने मार्गक्रमण करण्यास सुरुवात केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून केलेल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात ‘गतिशक्ती राष्ट्रीय योजने’ची घोषणा केली होती. या अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनेसाठी मोदी सरकारने १०० लाख कोटींची तरतूद केली आहे. या योजनेच्या माध्यमातून देशभरात पायाभूत सुविधांच्या विकासासोबतच मोठ्या प्रमाणावर रोजगारही उपलब्ध होणार आहेत. आधुनिक आणि वेगवान भारत घडवायचा असेल, तर देशातील पायाभूत सुविधांची निर्मिती करून आणि या सुविधा आणखी बळकट करून सर्वांगीण विकास साधता येणे शक्य व्हावे यासाठी ‘पंतप्रधान गतिशक्ती राष्ट्रीय योजने’चा शुभारंभ पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी केला. ही योजना औद्योगिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी असून दळणवळणासाठी गतिशक्ती ही खास योजना असेल. जेणेकरून सामान्य माणसांच्या प्रवासाचा वेळ वाचेल. त्यामुळे लोकांची आणि उद्योगांची कार्यक्षमता वाढेल. या सगळ्यांमुळे भारतीय उद्योजकांना जागतिक पातळीवरील स्पर्धेला तोंड देणे शक्य होणार आहे. आगामी काळात देशाचा सर्वांगीण विकास करायचा असेल, तर उत्पादन क्षमता आणि निर्यातही वाढवावी लागेल. भारतातील उत्पादकांनी त्यांचे उत्पादन हे भारताची ओळख असल्याचे लक्षात ठेऊन जगाच्या बाजारपेठेवर आपले अधिराज्य गाजविण्याचे स्वप्न उत्पादकांनी पाहायला हवे व त्यासाठी ‘गतिशक्ती नॅशनल मास्टर प्लॅन’ हा औद्योगिक उपक्रमांना चालना देण्यासाठी महत्त्वाचा ठरू शकेल हे निश्चित. त्याचप्रमाणे स्थानिक मॅन्युफॅक्चरर्सना आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी ही योजना मदतकारक ठरणार असून भविष्यात आर्थिक क्षेत्राच्या विकसासाठीही ती फायदेशीर ठरेल, असे दिसते. नवीन युगातील तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर ही योजना भर देणार आहे. म्हणजेच आधुनिकता हा या योजनेचा गाभा आहे. त्यामुळेच देशातील तरुणांना या योजनेचा फारच मोठा फायदा होणार आहे. यात लाखो युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळेच ही योजना व्यापक आणि सर्वसमावेशक ठरू शकते.

देशातील तरुणांची संख्या जास्त असल्याने जगात आपला देश तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. याच युवाशक्तीला योग्य मार्गदर्शन, शिक्षण आणि रोजगार उपलब्ध झाल्यास संपूर्ण देशाचा विकास झपाट्याने साध्य करता होईल हे जाणून पंतप्रधान मोदी यांनी ‘गतिशक्ती योजने’चा शुभारंभ केला. विशेष म्हणजे केंद्रातर्फे देशभरात वििवध पायाभूत सुविधांची कामे सुरू असतात. मात्र ही कामे आणि योजना यांचा आणि संबंधित खाती यांचा योग्य ताळमेळ नसल्याने अनेक प्रकल्प रखडतात आणि पर्यायाने त्या प्रकल्पांची किंमतही अवाच्या सव्वा वाढत जाते. या योजना वेळेत सुरू झाल्या आणि नियोजित वेळेत अस्तित्वात आल्या, तर देशाचा विकास निधी मोठ्या प्रमाणात वाचू शकतो आणि या पैशाचा वापर अन्य प्रकल्पांसाठी करणे शक्य होऊ शकते.

त्यामुळेच अशा पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या कामांमध्ये समन्वय राखण्यासाठी आणि सर्व संबंधित खात्यांना एकत्र आणणे महत्त्वाचे असल्याने ‘गतिशक्ती योजना’ अस्तित्वात आली आहे. देशातील पायाभूत सुविधा या आणखी बळकट केल्या पाहिजेत. यासाठीच दळणवळणासाठी गतिशक्ती ही खास योजना ठरणार आहे. विशेष म्हणजे पायाभूत सुविधांशी संबंधित खात्याच्या मंत्र्यांमध्ये नितीन गडकरी, पीयूष गोयल, अश्विनी वैष्णव आणि ज्योतिरादित्य शिंदे यांचा समावेश असून हे तिन्ही मंत्री तरुण आणि खात्यांशी संबंधित कामे हातोटीने करून घेण्यात वाकबगार आहेत. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून या सर्वांचा मेळ जमल्यास फार मोठे कार्य सिद्धीस जाणे शक्य होईल.

पायाभूत सुविधा बळकट झाल्यास सामान्य माणसांच्या प्रवासाचा वेळ वाचेल. त्यामुळे लोकांची आणि उद्योगांची कार्यक्षमताही वाढेल. या सगळ्यांमुळे भारतीय उद्योजकांना जागतिक पातळीवरील स्पर्धेला तोंड देणे शक्य होणार आहे. हा संपूर्ण देशासाठी मास्टर प्लान असेल, जो प्लान देशात हॉलिस्टिक इंफ्रास्ट्रक्चरचा पाया रचणार आहे. सध्या दळणवळणाच्या साधनांमध्ये ताळमेळ नाही, ही योजना यावर देखील काम करणार आहे. भारताला २१व्या शतकात नव्या उंचीवर नेण्यासाठी देशाच्या सामर्थ्याचा योग्य वापर होणे गरजेचे आहे. त्यासाठी समाजातील जे वर्ग मागे पडले आहेत, त्यांना आपल्याला मदतीचा हात दिलाच पाहिजे. तसेच प्रगतीपासून काही अंतर दूर राहिलेला पूर्व भारत, ईशान्य भाग, जम्मू – काश्मीर, लडाखसह संपूर्ण हिमालय क्षेत्र असो, आपला किनारपट्टीचा भाग किंवा आदिवासी क्षेत्र असो, हे भाग भविष्यात भारताच्या विकासाचा मोठा आधार बनू शकतील आणि त्यासाठी त्यांच्या विकासासाठी ‘गतिशक्ती योजना’ मैलाचा दगड ठरू शकेल, हे निश्चत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -