Friday, March 29, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्सअवकाशाची शाळा…

अवकाशाची शाळा…

बिन भिंतीच्या शाळेमध्ये अवकाशाचा फळा
विजा नि पाऊस तेथ चांदण्या पाहा लाविती लळा
बिनभिंतीचे घर हे मोठे, इंद्रधनू सुंदर
चांदण्यांच्या तळ्यात तेथे चंद्राचे मंदिर…

नक्षत्रांची उठती अक्षरे मुळीच नसती वारे
धुमकेतू अन् चंद्र चांदण्या सोबतीस तारे
नाही गुरुत्वाकर्षण तेथे सारे पाहा उडतात
आयू वाढत नाही, तेथे तरुणच राहतात…

किती मजा ना, तरुण सारे आणि दिसू सुंदर
अवकाशाच्या शाळेमध्ये चला बांधू या घर
विश्वच सारे पाहू तेथून ग्रह तारे दिसतील
ढगात बसूनी पालखीतून सारे पाहा फिरतील…

काळ्याकरड्या ढगांवरूनी गिरवू तिथे अक्षरे
कडाड तडके बिजली तेथे भरेल मग कापरे
सळसळ येतील धारा सुंदर अंगोपांगी लेऊ
अवकाशाच्या मंडपात मग सारे भिजून जाऊ…

अधांतरी राहून तिथे हो ग्रहताऱ्यांवरती
बिनभिंतीच्या शाळेवरती खूप करू या प्रीती
नवे नवे ते मिळवू ज्ञान नि होऊ खूप शहाणे
अवकाशाच्या विशालतेचे चला गाऊ या गाणे…

विश्व हे आहे सारे सुंदर, करू मनोहर
मनामनातून आपण बांधू अवकाशच सुंदर
अवकाशाच्या घरात राहू अजरामर होऊ
अवकाशातून दुनिया सारी, रोज रोज पाहू…

– प्रा. सुमती पवार

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -