लखनऊ : समाजवादी पक्षाचे दिग्गज नेते आणि आमदार आझम खान यांना गुरुवारी न्यायालयाने ३ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली असून २५ हजारांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी त्यांना ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

२०१९च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान आझम खान यांनी एक भाषण केले होते. याच भाषणात त्यांनी चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीची नोंद करून घेण्यात आली. त्यानंतर खटला उभा राहिला आणि दोन्ही बाजूंची सुनावणी झाली. त्यावर न्यायालयाने आज आझम खान यांना दोषी ठरवले आणि शिक्षा सुनावली.

न्यायालयाने आझम खान यांना शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची आमदारकी रद्द होण्याची शक्यता आहे. असे असले तरी त्यांना याप्रकरणात जामीन मिळू शकतो. त्यांच्याकडे जामीन मिळवण्यासाठी एक महिन्याचा वेळ आहे. तसेच आझम खान या निर्णयाला उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ शकतात.