Friday, March 29, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यवैयक्तिक समस्यांचे कुटुंबाकडून निवारण अत्यावश्यक...

वैयक्तिक समस्यांचे कुटुंबाकडून निवारण अत्यावश्यक…

मागील लेखात आपण पाहिले की कुटुंबातील प्रत्येकाची समस्या, प्रत्येकाला होणारा त्रास हा त्याचा वैयक्तिक विषय आहे म्हणून घरातील इतर लोकांनी त्याकडे कानाडोळा केला, तर पूर्ण कुटुंबाला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. या लेखातून आपण अजून एका सत्यघटनेच्या आधारे कौटुंबिक एकी नसेल तर, घरातील लोकांची एकमेकांना साथ नसेल तर घरातील किती जणांना किती वेगवेगळ्या स्वरूपाच्या त्रासाला सामोरं जावं लागतं यावर विचारमंथन करणार आहोत. स्मिता (काल्पनिक नाव) सुशिक्षित कुटुंबातील सून असून तिच्या लग्नाला आता जवळपास पंचवीस वर्षं झालीत. सुबोध (काल्पनिक नाव) स्मिताचा पती देखील सुशिक्षित, हुशार आणि बऱ्यापैकी आर्थिक परिस्थिती असलेला व्यावसायिक आहे. त्यांना एकुलता एक मुलगा (हर्षद काल्पनिक नाव)अत्यंत हुशार असून महाविद्यालयीन विद्यार्थी आहे. एकत्र कुटुंबातील हे दोघे पती-पत्नी असून घरात सासू-सासरे, सुबोधचे दोन धाकटे भाऊ, त्यांच्या पत्नी आणि त्यांची मुलं असा हा परिवार. सुबोधला दोन विवाहित बहिणी असून त्यांच्या मुली लग्नाच्या वयातील आहेत.

सुबोध आणि स्मिता घरात मोठे होते, मागील चार-पाच वर्षांत सुबोधच्या दोन्ही धाकट्या भावांनी स्वतःचे घर घेऊन आपापले वेगळे संसार थाटले होते. दोघांचीही मुलं आता बऱ्यापैकी शिकून नुकतीच नोकरीला सुद्धा लागली होती. वडिलोपार्जित घरात सध्या फक्त सुबोध, स्मिता आणि त्यांचा मुलगा हर्षद तसेच स्मिताचे सासू- सासरे राहतात. स्मिता समुपदेशनला आली तेव्हा घराचीही घडी पूर्णपणे विस्कटलेली होती. स्मिताच्या सांगण्यानुसार दोन-तीन वर्षांपासून सुबोधच्या आयुष्यात एक घटस्फोटित महिला आली आहे. त्याच्या व्यवसायाच्या निमित्ताने त्यांची ओळख झाली आणि दोघांमध्ये अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. स्मिताला जसजसा संशय येऊ लागला तसतसं दोघांमध्ये वाद, भांडण, कटकटी वाढू लागल्या. स्मिताला पतीने या वयात असे चुकीचे पाऊल उचलणे अजिबात मान्य नव्हते.

पण सुबोध त्याच्या मैत्रिणीला सोडायला काही तयार नव्हता. दोघांच्या दररोज होणाऱ्या वादाला कंटाळून नीताचे सासू-सासरे त्यांच्या मूळ गावी राहायला निघून गेले होते. आता घरात फक्त सुबोध, स्मिता आणि मुलगा हर्षद राहत होते. आता तर सुबोधचं बाहेरील प्रकरण खूपच वाढलं आणि स्मिताची सहनशक्ती पणाला लागली. तिला या सगळ्यांचा खूप मानसिक त्रास होऊ लागला.स्मिताने सुबोधच्या दोन्ही भावांना, बहिणींना हा प्रकार सातत्याने कानावर घालणे सुरू केले. तुम्ही सगळेच इकडे, या आपण सुबोधशी बोलून, त्याला समजावून हा विषय बंद करूयात, आपण त्या महिलेला समजावून सांगू, तिच्या घरातल्या लोकांच्या कानावर घालू हे प्रकरण, थांबलं पाहिजे अशा अपेक्षा स्मिता सगळ्यांकडून करत होती. ते माझं ऐकत नाहीयेत, हर्षदने खूप टेन्शन घेतले आहे, आपण सगळेच एकत्र येऊन प्रयत्न करू असे तिचे म्हणणे होते. सुबोधच्या भावांनी, बहिणींनी हे प्रकरण अतिशय अलिप्तपणे हाताळलं आणि किरकोळ गोष्ट समजून स्मितालाच सल्ले देणं सुरू ठेवलं. तूच चुकत असशील असं कसं, त्याने प्रेम प्रकरण केलं, तू त्याच्या गरजा पूर्ण करत नसशील, तू त्याच्या मनाप्रमाणे वाग, सगळं ठीक होईल, जास्त मनावर घेऊ नकोस, आजकाल सर्रास अशी प्रकरणं होतात, तू खंबीर हो, तुला काय कमी आहे. तुझ्या आणि मुलाच्या गरजा भागवतोय न सुबोध, दुर्लक्ष कर त्याच्या प्रकरणाकडे, यासारखी वक्तव्य सुबोधच्या घरातील लोक स्मिताशी बोलतांना करीत होती. आता आम्ही वेगळे राहतोय, आम्हाला आमचीच टेन्शन आहेत. तुम्ही दोघे तुमच्या पद्धतीने हा प्रश्न सोडवा, असं सुबोधच्या दोन्ही भावांनी स्मिताला सांगून टाकलं होतं. तर स्मिताच्या जावा, ताई हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. आम्हाला यात घेऊ नका इतकंच बोलू शकत होत्या. आम्हाला सासरी इतर जबाबदाऱ्या आहेत. वाहिनी तुझं तू बघून घे, वाटल्यास हर्षदला पाठव आमच्याकडे. चार दिवस थोडा रिलॅक्स होईल, अशी उत्तरं स्मिताला मिळत गेली.

शेवटी एक दिवस व्हायचं ते झालंच. सुबोध त्या घटस्फोटित महिलेला घरी घेऊन आला आणि त्याने स्मिताला सांगून टाकलं की आम्ही आता इथेच एकत्र राहणार आहोत. आम्ही लवकरच लग्न करणार आहोत, मी हिच्या पहिल्या लग्नापासून झालेल्या दोन मुलींसहित स्वीकार केलेला आहे. तू इथे आमच्यात राहू शकतेस किंवा तुला जो निर्णय घ्यायचा तो तू घेऊ शकतेस. हे सर्व ऐकून आणि पाहून स्मिता हतबल झाली. तिने सुबोधला समजावून पाहिलं, रडून पाहिलं, भांडून पाहिलं. शेवटी हा अपमान सहन न होऊन ती हर्षदला घेऊन थोड्या दिवसांसाठी माहेरी निघून आली होती. आता या सर्व परिस्थितीमध्ये काय निर्णय घ्यावा यासाठी स्मिता समुपदेशनला आलेली होती.

सुबोधच्या या प्रेम प्रकरणाची माहिती तसेच एक घटस्फोटित महिला आणि तिच्या दोन मुली स्वतःच्या घरात घेऊन राहण्याची बातमी सुबोधच्या सर्व नातेवाईकांमध्ये वाऱ्यासारखी पसरली आणि सुबोधच्या पत्नीला, भावांना, बहिणींनी, त्यांच्या मुलांना इतर सर्व नातेवाईक, मित्र मंडळी, शेजारी यांचे फोन येऊ लागले. त्यांच्या समाजात या प्रकरणावर भरपूर चर्चा आणि सुबोधच्या संपूर्ण कुटुंबाची निंदा-नालस्ती सुरू झाली. सगळ्या कुटुंबांची सामाजिक बदनामी होऊ लागली. सुबोधच्या भावाची तरुण मुलं, त्यांना त्यांच्या कॉलेजमध्ये, ऑफिसमध्ये या गोष्टीचा कमीपणा वाटू लागला. सुबोधच्या बहिणींच्या घरी म्हणजेच सासरी त्यांना घालून पाडून बोलायला सुरुवात झाली.

सुबोधच्या एका भावाचा मुलगा जो लव्ह मॅरेज करणार होता, लवकरच त्यांच्या लग्नाची तयारी सुरू होणार होती, त्याची होणारी बायको या प्रकरणामुळे प्रचंड घाबरली आणि तिने त्यांचं रिलेशनशिप तोडून लग्नाला नकार दिला. सुबोधचा हा पुतण्या या धक्क्यांमुळे इतका डिप्रेशनमध्ये गेला की त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुबोधच्या बहिणींची मुलं-मुली, तर मामाने असं कसं आणि काय करून ठेवलं यावर प्रचंड नाराज झाली. कारणपण तसंच होतं. सुबोधच्या एका भाचीचा साखरपुडा झालेला होता आणि आता सुबोधचं प्रकरण कळल्यामुळे समोरच्यांनी या भाचीला नकार कळवला होता. सुबोधवर घटस्फोटित महिला आणि तिच्या दोन मुलींच्या जबाबदाऱ्या वाढल्यामुळे त्याला वडिलोपार्जित घर विकावे लागले आणि तो भाडेतत्त्वावर घर घेऊन राहू लागला होता.

वडिलोपार्जित घरातील हिस्सा इतर भावांना देऊ शकेल इतकी आर्थिक कुवत सुद्धा आता सुबोधमध्ये राहिली नव्हती. त्यामुळे पूर्ण कुटुंबात वडिलोपार्जित प्रॉपर्टीचे सुबोधने नुकसान केले, आपला हिस्सा मिळाला नाही म्हणून सगळ्यांची मनं कलुषित झाली. या वयात स्मिताला स्वतःचा संसार वाचवायचा होता, घरातले कसेही वागलेत तरी स्वतःच्या कुटुंबाला तिला या परिस्थितीमधून सावरायचं होतं आणि त्यासाठी ती प्रयत्नांची परकाष्टा करीत होती. स्मिताची एकच खंत होती की घरातल्या सगळ्यांनी माझी आधीच साथ दिली असती, माझ्यावर विश्वास ठेवला असता, तर आज ही वेळ आली नसती.

-मीनाक्षी जगदाळे

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -