Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रपालघरswim : शुभम वनमाळीने केले बोर्डी ते डहाणू अंतर पोहून पार

swim : शुभम वनमाळीने केले बोर्डी ते डहाणू अंतर पोहून पार

महिनाभरात गोवा ते मुंबई सागरी प्रवास करण्याचा मानस

डहाणू (वार्ताहर) : डहाणू तालुक्यातील वरोर येथील रहिवासी असलेल्या व सध्या नेरूळमध्ये वास्तव्यास असलेला शुभम वनमाळी ह्याने समुद्रातून बोर्डी ते डहाणूपर्यंत अंतर नुकतेच पोहून (swim) पार केले.

याआधी देखील शुभम ने मुंबई ते डहाणू हे अंतर पोहून विक्रम आपल्या नावे नोंदवला होता. येत्या महिनाभरात गोवा ते मुंबई असा ४१३ किलोमीटरचा सागरी प्रवास ११ ते १५ दिवसांत पोहून पार करण्याचा शुभमचा मानस आहे.

शिवछत्रपती पुरस्कार विजेता आंतरराष्ट्रीय ओपन वॉटर जलतरणपटू शुभम वनमाळी ह्याने बोर्डी बीच ते डहाणू बीच हे २३ किलोमीटर अंतर केवळ ५ तास १८ मिनिटांत पोहून पूर्ण केले आहे. बोर्डीवरून सकाळी ७.४५ वाजता निघालेला शुभम डहाणू बीच येथे दुपारी १.०० वाजता पोहचला. यापूर्वी शुभमने जगप्रसिद्ध इंग्लिश खाडी, जिब्राल्टरची समुद्रधुनी, कॅटलीना खाडी, मॅनहटन मॅरेथॉन स्विम, राऊंड ट्रीप एन्जल आयलँड स्विम, परहेन्शियन आयलँड मॅरेथॉन स्विम, राजभवन, वाळकेश्वर ते गेटवे ऑफ इंडिया, धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया आणि गेटवे ऑफ इंडिया ते धरमतर अशा विविध राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय खाड्या पोहून विक्रम केलेले आहेत. बोर्डी ते डहाणू हा उपक्रम विद्यार्थ्यांमधील अध्ययन अक्षमतेच्या जागरुकतेसाठी करीत असल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांकडून दिली आहे.

शुभमच्या ह्या विक्रमासाठी त्याचा सत्कार करण्याचा कार्यक्रम डहाणू पोंदा हायस्कूलमध्ये पार पडला. ह्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डहाणूचे तहसीलदार अभिजित देशमुख, डहाणू पोलीस ठाण्याचे प्रभारी नामदेव बंडगर, नवनिर्वाचित डहाणू पंचायत समिती सभापती प्रवीण गवळी, पोंदा शाळेचे विश्वस्त व शिक्षक यांच्यासह शुभमला नेहमीच सहकार्य करणारे शिव शक्ती मित्रमंडळ कासा व त्याचे सहकारी उपस्थित होते.

येत्या महिनाभरात गोवा ते मुंबई असा ४१३ किलोमीटरचा सागरी प्रवास ११ ते १५ दिवसांत पोहून पार करण्याचा शुभमचा मानस आहे. परंतु प्रायोजक, देणगीदार मिळत नसल्याने हा कार्यक्रम थोडा पुढे जाऊ शकतो अशी माहिती त्याच्या कुटुंबियांकडून देण्यात आली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -