Saturday, April 20, 2024
Homeताज्या घडामोडीशिवसेना आमदार रमेश लटके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुबईत निधन

शिवसेना आमदार रमेश लटके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुबईत निधन

मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे विद्यमान आमदार रमेश लटके यांचे बुधवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने दुबईत निधन झाले. ते ५२ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच स्थानिकांनी त्यांच्या कार्यालयाबाहेर एकच गर्दी केली होती. मिळालेल्या माहितीनुसार लटके हे सहपरिवार दुबईला होते. तिथे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. लटके यांच्या जाण्याने राजकीय क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. दरम्यान राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले की, आम्ही सध्या पार्थिव देशात परत आणण्याचे प्रयत्न करत आहोत.

लटके यांनी सार्वजनिक गणेश मंडळाच्या अध्यक्षपदापासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. गटप्रमुख ते आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास होता. या प्रवासादरम्यान त्यांनी शाखाप्रमुख, नगरसेवक यांसह विविध पदे यशस्वीरित्या भूषवली. त्यांचा दांडगा जनसंपर्क होता. लटके यांनी १९९७ ते २०१२ असे सलग तीन वेळा नगरसवेक पद भूषवले.

त्यानंतर २०१४ मध्ये लटके यांनी पहिल्यांदा अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ मूळचा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. आघाडीच्या सरकारमध्ये आरोग्यमंत्री असलेल्या सुरेश शेट्टींना मतदारांनी १९९९ ते २००९ दरम्यान सलग तीन वेळा निवडून दिले होते. त्यामुळे सुरेश शेट्टींचा दबदबा होता. काँग्रेस, शिवसेना आणि भाजपा अशी ही तिहेरी लढत होती. भाजपाकडून सुनील यादव, तर काँग्रेसकडून सुरेश शेट्टी हे प्रतिस्पर्धी होते. मात्र जनतेने लटकेंना कौल दिला. लटकेंनी भाजपाच्या सुनील यादव यांचा ५ हजार ४७९ मतांनी पराभव केला. तर काँग्रेसची तिसऱ्या स्थानी घसरण झाली. यानंतर २०१९ च्या लढतीत लटके यांनी अपक्ष मुरजी पटेल यांचा १६ हजार ९६५ इतक्या मतांच्या फरकाने विजय मिळवला होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -