Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेठाण्यात शिवसैनिकांची रिक्षाचालकांना मारहाण

ठाण्यात शिवसैनिकांची रिक्षाचालकांना मारहाण

ठाणे : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराच्या निषेधार्थ आज महाविकासआघाडीकडून महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. हा बंद यशस्वी करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही प्रमुख पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते रस्त्यावर देखील उतरल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांनी स्वतःहून दुकाने बंद ठेवली. दरम्यान, ठाणे शहरात बंद दरम्यान रिक्षा चालवणाऱ्या रिक्षाचालकांना शिवसैनिकांकडून रस्त्यावरच मारहाण करण्यात आल्याचाही प्रकार समोर आला आहे.

ठाण्यामध्ये बंद पाळण्यासाठी शिवसैनिकांची एकप्रकारे दादागिरी पाहायला मिळाली. विशेष म्हणजे रिक्षाचालकांना मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांमध्ये उपमहापौरांचे पती पवन कदम यांचा देखील सहभाग दिसून आला. महाराष्ट्र बंद दरम्यान रिक्षा बंद ठेवण्यासाठी शिवसैनिकांनी रस्त्यावर उतर रिक्षाचालकांना दमदाटी करत, मारहाण केल्याचे दिसून आले.

महाराष्ट्र बंद असल्याने टीएमटी बससेवा बंद आहे, परिणामी नागरिकांना इच्छित स्थळी पोहचण्यासाठी रिक्षाचा वापर करावा लागत आहे. परंतु, शिवसैनिकांच्या या मारहाणीमुळे रिक्षाचालकांमध्येही दहशतीचे वातावरण पहायला मिळत आहे.

ठाण्यामधील जांभळीनाका परिसरात हा प्रकार घडला. या ठिकाणी अनेक शिवसैनिक काठीने रस्त्यावर चालणाऱ्या रिक्षांमधील रिक्षाचालकांना मारहाण करत होते व रिक्षा बंद करा, असे धमकावत होते. याशिवाय काही जणांच्या टोळक्याने शहरात फिरुन जी दुकानं उघडी होती ती बंद करण्यासाठी दमदाटी करण्यात आल्याचेही समोर आले आहे. अनेक दुकानांमध्ये शिवसैनिक घुसले होते व दुकान बंद करण्यास भाग पाडले. एकुणच ठाण्यामध्ये एक दहशतीचे वातावरण निर्माण करून हा बंद पाळण्यास भाग पाडला जात असल्याचे निदर्शनास आले. शिवसैनिकांच्या या कृतीचा अनेकांनी तीव्र निषेध नोंदवला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -