Thursday, April 25, 2024
Homeमहत्वाची बातमीभावांनो, शिवछत्रपतींची शपथ आहे, जीव द्यायचा नाही लावायचा

भावांनो, शिवछत्रपतींची शपथ आहे, जीव द्यायचा नाही लावायचा

शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांची भावनिक साद

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना शिवछत्रपतींची शपथ देत आत्महत्या न करण्याचे भावनिक आवाहन केले आहे.

राज्यात सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. याच दरम्यान, आज एका शेतकऱ्याने मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच आत्मदहनाचा प्रयत्न केला. यामध्ये हा शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. यानंतर लगेचच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्यातल्या शेतकऱ्यांना एक भावनिक पत्र लिहिले आहे.

आपल्या पत्रात एकनाथ शिंदे म्हणतात, “महाराष्ट्र हा लढवय्यांचा आहे. तुमच्यासारख्या कष्टकरी शेतकऱ्यांचा आहे, म्हणूनच भारताच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा देणारे लढाऊ बाण्याचे जवान या महाराष्ट्रातील शेतक-यांच्या पोटीच जन्माला आले आहेत. घाम गाळत जमीन कसून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून तुम्ही केवळ स्वतःचेच नव्हे, तर उभ्या महाराष्ट्राची देशाची भूक भागवण्याचेही काम करताहात, म्हणून तर या मराठी मातीवर पहिला हक्क कोणाचा असेल, तर तो तुम्हा शेतकरी बांधवांचा आहे.

परंतु, अचानक नैसर्गिक, कौटुंबिक, आर्थिक संकट आल्यावर तुम्हाला हवालदिल होताना पाहून मन कासावीस होऊन जातं, तुमच्यातलेच काही शेतकरी बांधव अनेक संकटातून सावरताना थकून जातात नि जगाकडे पाठ फिरवत आत्मघाताचा मार्ग पत्करतात. हे चित्र पाहून मात्र माझं मन एक सामान्य कष्टकरी कुटुंबातील माणूस म्हणून आणि या महाराष्ट्राचा कारभारी म्हणून विषण्ण होऊन जातं. वाटतं, की आपल्याच घरातलं कुणी आपण गमावलंय.

या पत्रात मुख्यमंत्री पुढे म्हणतात, “लक्षात घ्या, माझ्या शेतकरी भावांनो, तुम्ही आहात तर हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. तुमचा जीव असा कोणत्याही झाडाला टांगण्याइतका स्वस्त नाही. तुम्ही आमची संपत्ती आहात. माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे खेड्या-पाड्यातल्या शिवसैनिकांना नेहमी म्हणायचे, की ‘रडायचं नाही, लढायचं.’ शिवछत्रपतींची शपथ घालतो तुम्हाला, तुमचा तोलामोलाचा जीव असा वाऱ्यावर सोडून निघून जाऊ नका. आत्महत्या करू नका. मी तुमच्यासारखाच रांगड्या मनाचा सरळसाधा माणूस आहे. मला तुमच्या वेदना कळतात. काळजाला भिडतात. या आसमानी संकटातून, या सावकारी दुष्टचक्रातून तुम्हाला बाहेर काढण्यास मी कटिबद्ध आहे. आत्मघातात पराभव असतो आणि संघर्षात जगण्याचं लखलखतं यश सामावलेलं असतं.”

मी आणि माझं सरकार सतत २४ तास तुमच्यासाठी तुमच्या सोबत आहे, याची खात्री बाळगा… जीव देणं बंद करूयात, जीव लावूयात एकमेकांना. चला, नव्या सूर्याची नवी किरणं गाठीशी बांधूयात आणि आपण मिळून हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र नव्याने घडवूया, अशी ग्वाहीसुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या पत्राद्वारे शेतकऱ्यांना दिली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -