Friday, April 19, 2024

शरू…!

डॉ. विजया वाड

शरूला एक खोड होती. आलेल्या पाहुण्यांना जाम खूश करीत असे. “अरे वा! इतका आनंद झाला तुम्हास बघून! आप आये बहार आयी!”
पाहुणे खूशम् खूश न होतील तरच नवल. शरूची सासू मात्र विचलित होई. शरू लांब-लांब गप्पा मारत ‘बाहेर’ नि चायपाणी करीत आई आत ‘स्वैपाकघरात’! नवऱ्याला शरूची सवय पाठ झाली होती. गप्पाष्टक मांडणाऱ्या बायकोला शरूचा नवरा काही बोलत नसे. पण चाय-पाणी करणाऱ्या आईची त्याला भारी कणव येत असे. करे तो भी क्या?
आजकल नवरे चूप रहते हैं! बायको बोलती और बोलतीही रहती हैं! सासू खालमानेनं स्वयंपाक करती है! क्या करे? मुलगा हातचा जायचा! सुनेचा धाक! सूनवास हो!
पण कधीतरी खोड मोडतेच ना! शरूवरही ती वेळ आली. सुधा जोशी ही सख्खी लग्नाळू नणंद माहेरी आली. शरू अगदी ‘इन’ आणि ‘आऊट’ माहीत असलेली. बाळंतपणास आली… मग मुक्काम ‘मोठाच!’…
‘आप आये बहारे गयीच गयी’ असे लांब तोंड करून वहिनीस म्हणावयाचे होते. पण इतना उघड-उघड बोल नहीं सकते ना? नणंद बाई तोऱ्यात होत्या.
“शरू, आता माझ्या बाळाचा सर्व चार्ज तुजकडे देणार मी! शिशुविहार ते मम्मं ते गाई-गाई.” शरूच्या पोटात खोल खड्डा पडला. सासू मात्र प्रमुदित झाली.
“आता बघतेच तुझा तोरा ढळतो कसा ते!” हे भाव मनीचे चेहराभर पसरले, ते लपविता सुद्धा आले नाहीत सासूला! इन अँड आऊट ठाऊक सुधावन्सं आलेली ना!
शरू खूशम् खूश असल्याचं नाटक किती दिवस निभावणार ना? त्याच रात्री तिने नवऱ्याला सांगून टाकले, ‘रांधा, वाढा, उष्टी काढा’ यासाठी माझा जन्म नाही. मी ‘राजपत्रित अधिकारी’ म्हणून मानाने मिरविते समाजात. धुणी-भांडी, स्वयंपाकासाठी यांना फुलटायमर ठेवा! नवऱ्याची आई कष्टकरी मदतनीस ठेवायला बाहेर पडली. नर्मदाताई रुजू झाल्या. पण तोरा विलक्षण होता. पोळ्या म्हणजे ‘पोळे’ होते. भाजी खारट झाली होती. वरण जरुरीपेक्षा जहाल होते. सात दिवस कसेबसे काढले असतील नसतील. नर्मदाताईंनी दुप्पट पगाराची मागणी केली.
“अहो दहा पोळ्या नि पाच हजार?”
“पाचशे रुपये पोळी म्हणजे दिवसाचे
२० रुपये सुद्धा होत नाहीत. रिक्षाभाडे एक वेळचे पंचवीस रुपये होते.”
नर्मदाताईंच्या बोलण्यात खोट नव्हती. खरेपणा असला तरी अडीचचे पाच हजार करणे शरूला जड गेले. पण ऐतखोरपणा चटकन् जडतो ना!
“अहो मी काय म्हणते, सिगरेटचं
व्यसन तुम्ही सोडून द्या ना! उगाच भरमसाट! करता-करता जीव जातो! पुरवता-पुरवता जीव दमतो हो माझा” सगळा घाव आपणावर का? असे वाटणे साहजिकच होते ना नवरा जमातीला! पण त्याग दाखवणे सोपे होते. चोरून सिगरेट पिणे ऑफिस अवर्समध्ये शक्य होते. म्हणून त्याने अट मान्य केली. नि नियमितपणे लंच अवरमध्ये तो सिगरेट पिऊ लागला. जेहत्ते कालाचे ठायी ‘सारे’ ‘आलबेल’ होते.
शरू खूशम् खूश! पोळ्यांची बाई कायम! शरूला स्वैपाकघराचे तोंड, डबा भरण्यापुरते बघायचे होते! हळूहळू ते काम नर्मदाताईंना गळ्यातच मारले नि साई सुट्ट्यो..ऽऽऽ
पण एक तारखेला फुगा फुटला. नवऱ्याने सांगितले की, मूळ वेतनात रुपये पाच हजार महावार कपात झाली आहे. ‘स्वीकारा’ तर नोकरी! ‘न स्वीकारा?’ नो नोकरी!
शरू राजपत्रित अधिकारी! तिला असली ‘कपात’ न मानवणारी होती. तीही पाच हजार रुपये? अरे वा रे वा! नहीं चलेगा! पाच हजार बढ़े तो चलेगाच! अधोरेखित सकारात्मक विचार मनाला किती प्रमुदित करतात ना? पाच हजार रुपये पगारकपात अन् अडीच हजार रुपये पगारवाढ! स्वयंपाकिणीस?
“आजपासून तुम्ही ‘बसने’ कार्यालयात या. येताना चाली-चाली करीत या. तेवढाच पायांना व्यायाम.” नो टॅक्सी अजिबात नो नो…”
“बरं बायको.” नवरा खोटं बोलला. पगार कपात बिघडली, वगैरे झूट होते. आवई होती. तो टॅक्सीनेच ये-जा करणार होता. फक्त अलीकडच्या चौकात उतरणार होता. भांडण नै, तंटा नै! टॅक्सी येस्. वाहन येसयेस. बायको बिचारी नवऱ्याचे पाय चेपत असे. ‘दमतो’…, ‘चालतो’ म्हणून. पण खोटं फार दिवस लपत नाही. छुपत नाही. तिची मैत्रीण शारदा म्हणाली, “अगं, नवरा खोट्टं बोल्लतोय. पगारवाढ नाही, तशी कपातही नाही… मी त्याच कार्यालयात काम करते ना! गं!”
राजपत्रित अधिकारी असलेल्या बायकोने पगारपत्रकच मागवले नवरोजींचे. ते हातावर ठेवीत म्हणाली,
“ना पगारवाढ, ना कपात
खोटेपणा चढवून द्या परत खिशात.
पाच हजार मुकाट घराच द्यायचे
महिन्याच्या महागाईला लागायचे.”
नवरोजी नेहमीप्रमाणे बोलतीबंद झाले. अशी शरू जिंकली नि ते संसारात नेहमीप्रमाणे सवयीने हरले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -