Saturday, April 20, 2024
Homeताज्या घडामोडीकल्याण-डोंबिवलीत शेअर रिक्षा भाडे जैसे थे!

कल्याण-डोंबिवलीत शेअर रिक्षा भाडे जैसे थे!

आरटीओच्या दरपत्रकाला केराची टोपली

कल्याण (प्रतिनिधी): कल्याण-डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी सुरूच आहे. कल्याण उप प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) रिक्षाचालकांच्या मनमानीला आळा घालण्यासाठी शेअर रिक्षा भाडे निश्चितीचे दरपत्रक प्रसिद्ध केले आहे. मात्र या दरपत्रकाला रिक्षाचालकांनी केराची टोपली दाखवली आहे.

लॉकडाउनच्या काळापासून रिक्षाचालकांनी भाडे दरात वाढ केली असून, ही दरवाढ कमी करण्यास रिक्षाचालक आजही तयार नाहीत. कल्याण उप प्रादेशिक परिवहन विभागाने रिक्षाचालकांच्या मनमानीला आळा घालण्यासाठी शेअर रिक्षाभाडे निश्चितीचे दरपत्रक प्रसिद्ध केले आहे. मात्र हे दरपत्रक अद्याप कागदावर असून, सोमवारी रिक्षाचालकांनी प्रवाशांकडून किमान वीस रुपये भाडे आकारले. नऊ रुपये नाही, तर दहा रुपये देणाऱ्या ग्राहकांनाही रिक्षात बसू दिले जात नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येईल, असे आरटीओकडू केवळ सांगितले जात आहे. मात्र ना दर कमी झाल्याचे दिसले, ना कारवाई झाल्याचे दिसून आले. त्यामुळे रिक्षाचालकांची मुजोरी कायम असल्याचे दिसून येते.

मुंबई महानगरक्षेत्र परिवहन प्राधिकरण यांनी शेअर रिक्षा किमान भाडे २१ रुपये निश्चित केले असून, त्यानुसार कल्याण उप प्रादेशिक परिवहन हद्दीतील शेअर रिक्षाभाडे दर आरटीओकडून लागू करण्यात आले. बुधवारीच हे नवीन दर लागू झाले असून काही हरकतींचा विचार करत शुक्रवारी रात्री कल्याण आरटीओने सुधारित दरपत्रक समाज माध्यमातून व्हायरल केले. कोरोनापूर्वी किमान रिक्षाभाडे हे आठ रुपये होते. सुट्या पैशांचे कारण पुढे करीत रिक्षाचालक मनमानी पद्धतीने सर्रास दहा रुपये आकारत होते. तेच प्रवाशांकडे आठ रुपये देण्यासाठीही जवळ एक ते दोन रुपये सुट्टे नसतील तर वाद घालताना दिसत होते.

शेअर भाडेवाढ तर झाली आहेच, मात्र डायरेक्ट रिक्षा करून निश्चित स्थळ गाठायचे म्हटले तरी जेथे पूर्वी वीस रुपये आकारले जायचे, तेथे आज ६० ते ८० रुपये आकारले जात आहेत. आरटीओने सुधारित दरपत्रक लागू करून नियम मोडणाऱ्यांविरोधात कारवाईचे आदेश दिले आहेत. मात्र गेल्या दोन दिवसांत ना कोणत्या रिक्षा थांब्यावर दरपत्रक झळकले, ना कारवाई झाल्याचे दिसले. विशेष म्हणजे कोणतेच राजकीय पक्ष यावर बोलायला तयार नाहीत, किंवा नागरिकांसाठी आवाज उठवताना दिसत नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -